Dagdusheth_Ganpati_Agnihotra_Upasana_125Year

सामुदायिक अग्निहोत्र उपासना

‘दगडूशेठ’ गणपतीसमोर सामुदायिक अग्निहोत्र उपासना

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव

आपुलकी, पुणे आणि पुणे अग्निहोत्र सेवा मंडळाचा सहभाग; तब्बल ४५० हून अधिक पुणेकरांची उपस्थिती

पुणे : वातावरण शुद्धीसह ज्या अग्निहोत्रातील राखेचा शेतामध्ये उपयोग होतो आणि परिसरातील जंतूंचे प्रमाण कमी होते, अशा अग्निहोत्राची सामुदायिक उपासना पहाटेच्या वेळी करण्यात आली. कोणताही धर्म, पंथ वा स्त्री-पुरुष असा भेदाभद न मानता कोणीही ही उपासना करावी, असे सांगण्यात आले असून त्याप्रमाणे तब्बल ४५० हून अधिक पुणेकरांनी यामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवित दगडूशेठ गणपती चरणी प्रार्थना केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त सामुदायिक अग्निहोत्र उपासनेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे हेमंत रासने, सुनील रासने, माणिक चव्हाण, प्रकाश चव्हाण, मंगेश गुप्ते आदी उपस्थित होते. आपुलकी, पुणे व पुणे अग्निहोत्र सेवा मंडळाने या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. दगडूशेठच्या उत्सव मंडपामध्ये ही उपासना करण्याकरीता भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

उपक्रमाबाबत मंगेश गुप्ते म्हणाले, दररोज सूर्योदय व सूर्यास्ताला घरामध्ये वा कोणत्याही ठिकाणी करण्याची ही उपासना आहे. वेदांमध्ये हा यज्ञ सांगितला असून गायीचे तूप, पांढरे तांदूळ, अग्निकुंड आणि गोव-या एवढे साहित्य यासाठी लागते. याशिवाय यज्ञाचे मंत्र देखील सहजसोपे असून कोणीही हा यज्ञ करु शकतो. भारतासह परदेशात देखील अनेकजण दिवसातून दोन वेळा नित्याने हा यज्ञ करतात. विश्व एक, उपासना एक अशा प्रकारचा एकतेचा संदेश देणारा हा यज्ञ असून प्रदूषणावर मात करण्याकरीता रामबाण उपाय आहे, असेही त्यांनी सांगितले.

Share
This