Dagdusheth_Ganpati_Atharvshirsh_pathan_125Year_2

अथर्वशीर्ष पठण सोहळा

अथर्वशीर्षातून ३१ हजार महिलांनी केला स्त्री शक्तीचा जागर

ॠषीपंचमीनिमित्त पहाटे अथर्वशीर्ष पठण सोहळा; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट

पुणे : ओम् नमस्ते गणपतये… ओम गं गणपतये नम:… मोरया, मोरया… च्या जयघोषाने तब्बल ३१ हजार पेक्षा अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर केला. पारंपरिक वेशात पहाटे ४ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणेश नामाचा जयघोष करीत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक पहायला मिळाला.

निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, अरुण भालेराव, शुभांगी भालेराव यांसह महिला कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थित होत्या. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणातील या उपक्रमाचे ३१ वे वर्ष होते.

प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, महिलांशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही. स्वातंत्र्याकरीता देखील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. महिलांमध्ये असणारी शक्ती आपण ओळखलेली नाही, त्यामुळे महिलांना देखील समान अधिकार मिळायला हवे, असे म्हणतो. कोणत्याही समाजाचे व्यक्ती, कुटुंब आणि समाज हे घटक असतात. अन्न व पाणी मिळाले की आपण जीवन जगतो, असे नाही. चांगले जीवन जगण्यासाठी भक्ती, शक्ती, सद््भाव, प्रेम आणि शांती गरजेचे आहे, त्यामुळेच समाज सुसंस्कृत होतो. स्त्री च्या सद््भावना घरातच राहण्यापेक्षा समाजात याव्या, तरच समाजात शांती निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले.

अशोक गोडसे म्हणाले, तब्बल ३१ वर्षांपूर्वी महिलांचा सहभाग या गणेशोत्सवात असावा, याकरीता ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांच्या विचारातून या उपक्रमाला सुरुवात झाली. केवळ १०१ महिलांपासून सुरु झालेल्या उपक्रमात आज ३१ हजार महिला सहभागी झाल्या आहेत. महापौर मुक्ता टिळक यांनी मनोगत व्यक्त केले.

Share
This