Dagdusheth_Ganpati_CM_Visit_125Year

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवभारत निर्मीतीमध्ये वैयक्तिकदृष्टया योगदान देण्याचा संकल्प करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस: दगडूशेठ गणपतीचरणी सर्व विघ्न दूर करण्याकरीता साकडे

पुणे : आपण गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत. त्यावर्षी पुण्यात येऊन गणरायाला वंदन करण्याची मला संधी मिळाली. श्रीगणेश हे विघ्नहर्ता आहेत. देश आणि राज्यासमोरची सर्व विघ्न त्यांनी दूर करावे. तसेच ही विघ्न दूर करण्याकरीता सगळ्यांना शक्ती द्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवभारत निर्मीतीची संकल्पना दिली आहे. पुढील पाच वर्षात ही संकल्पना प्रत्येकाने वैयक्तिकदृष्टया राबवायची आहे. भ्रष्टाचारमुक्त, दहशतवाद, जातीयता व अस्वच्छता मुक्त भारत आपल्याला घडवायचा आहे, त्यामुळे गणेशचरणी या निमित्ताने आपण संकल्पित व्हा आणि नवभारत निर्मीतीत योगदान द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशभक्तांना केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त फडणवीस यांच्या हस्ते ब्रह्मणस्पती मंदिराच्या विद्युतरोषणाईचे उद््घाटन झाले. यावेळी खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीष बापट, महापौर मुक्ता टिळक, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, सुनील रासने, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.

अशोक गोडसे म्हणाले, उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना आपल्यामुळे उत्साह मिळाला आहे. आपण कार्यकर्त्यांना चांगली वागणूक दिली, याबद्दल आपले आभार, अशी शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते श्रीं ची आरती करण्यात आली. तसेच मंदिराचा देखावा साकारणारे शिल्पकार विवेक खटावकर, गणपतीचे दागिने घडविणारे पु.ना.गाडगीळ चे सौरभ गाडगीळ व पराग गाडगीळ आदींचा सन्मान फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ट्रस्टच्या श्रीगणेश नामावली या कॅलेंडरचे प्रकाशनही करण्यात आले.

Share
This