Dagdusheth_Ganpati_Guinness_World_Record

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

मोदकाच्या केकची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजन

द केक हाऊस, न-हे अंतर्गत १६ जणांनी केला ८ तासात विक्रम

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त तब्बल १ हजार ९७० किलो मोदकाचा चॉकलेट केक साकारण्यात आला. या केकची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून त्याबाबतचे प्रमाणपत्र पालकमंत्री गिरीष बापट यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. न-हे मधील द केक हाऊसच्या १६ जणांनी अवघ्या ८ तासात हा विक्रम केला आहे.

सातारा रस्त्यावरील पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या कलादालनात हा विक्रम करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे आॅफिशियल अ‍ॅडज्युडिकेटर स्वप्निल डांगरीकर, केक साकारणारे मार्गदर्शक धर्मनाथ गायकवाड, अक्षय मोरे आदी उपस्थित होते.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे स्वप्निल डांगरीकर म्हणाले, पुण्यामध्ये साकारलेल्या या मोदकाच्या केकचा विक्रम झाला असून हा नवा विक्रम आहे. यापूर्वी सन २००९ मध्ये १ हजार ४१ किलोचा केक स्पेनमध्ये साकारण्यात आला होता. त्यानंतर आजपर्यंत अशा प्रकारचा प्रयत्न झाला नाही. बुधवारी (दि.२३) दुपारी सुरु झालेली केक तयार करण्याची प्रक्रिया रात्री ११.३० वाजता संपली. त्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले असून संकेतस्थळावर लवकरच नोंद होईल.

केक साकारणारे मार्गदर्शक धर्मनाथ गायकवाड म्हणाले, केक करण्याकरीता १ हजार किलो तयार केक पावडर, १ हजार १०० किलो चॉकलेट ट्रफल आणि ५० लीटर क्रिम लागले आहे. केकचा आकार २३ बाय ३५ फूट असून याकरीता ३ दिवसांपासून तयारी सुरु होती. याकरीता विविध केक सप्लायर्सनी देखील सहकार्य केले आहे.

अशोक गोडसे म्हणाले, शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त विविध उपक्रम सुरु असून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणारा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. मोदकाच्या केकचा हा प्रसाद सणस मैदानावर महापालिकेच्या वतीने आयोजित गणेश मूर्ती बनविणे स्पर्धेतील चिमुकल्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Share
This