Dagdusheth_Ganpati_Bela_Shende_125Year

लाईव्ह इन कॉन्सर्ट

लोकप्रिय प्रेमगीतांची रसिकांवर मोहिनी

गायिका बेला शेंड्ये आणि संदीप उबाळे यांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव

पुणे : मन उधाण वा-याचे… ओल्या सांजवेळी… सर सुखाची श्रावणी… धुंद होते शब्द सारे… अशा तरुणाईच्या लोकप्रिय प्रेमगीतांच्या सादरीकरणाने पुणेकरांनी कर्णमधुर संगीताची अनुभूती घेतली. युगुलगीते, लोकसंगीत, लावणी अशा विविध संगीत प्रकारांची मोहिनी गायिका बेला शेंड्ये यांनी रसिकांवर घातली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये बेला… लाईव्ह इन कॉन्सर्ट हा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाची सुरुवात वंदूया गणेशा… या गणेश वंदनेने झाली. यानंतर का कळेना कोणत्या क्षणी… या मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटातील गीताला रसिकांनी मनापासून दाद दिली. राती अर्ध्या राती… या आधुनिक लावणीच्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. जोधा अकबर चित्रपटातील संगीतकार ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेले मनमोहना तुम बिन पाऊ कैसे चैन… या गीताने वातावरण भक्तीमय झाले.

उत्तरार्धात, पहेली चित्रपटातील कंगना बिन मर्जी के खनके ना… या गीताने राजस्थानी लोकसंगीताचा बाज रसिकांनी अनुभवला. खेळ मांडला… कधी तू… याड लागल… या गायक संदीप उबाळे यांनी सादर केलेल्या गीताला रसिकांनी विशेष दाद दिली. अप्सरा आली… या नटरंग चित्रपटातील लावणीने कार्यक्रमात बहार आणली. गोमू संगतीनं… एक लाजरान साजरा मुखडा… मळ्याच्या मळ्यामंदी… गं साजणी… अशा जुन्या मराठी गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला उत्तरोत्तर रंग चढला. अविनाश चंद्रचूड (सिंथेसायझर), वरद कथापूरकर (बासरी), रितेश ओव्हळ (गिटार) यांनी साथसंगत केली. अभिनेता अभिजीत खांडकेकर यांनी निवेदन केले.

Share
This