Dagdusheth_Ganpati_Bhavsargami_125Year

‘भावसरगम’ मधून भावगीतांचा सुरेल नजराणा

प्रख्यात गायक पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या गायकीने रसिक मंत्रमुग्ध; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव

पुणे : केव्हा तरी पहाटे … तिन्ही सांजा सखे मिळाल्या… उजाडल्यावरी सख्या… अशा विविध भावभावनांचे सुरेल चित्रण असलेल्या भावगीतांच्या सादरीकरणाने रसिकांना मराठी संगीताच्या सुवर्णकाळाची आठवण करून दिली. प्रख्यात गायक व संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर, गायिका राधा मंगेशकर आणि गायिका विभावरी आपटे यांनी भावगीतांचा सुरेल नजराणा रसिकांसमोर ठेवला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये भावसरगम हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात मोगरा फुलला… या संत ज्ञानेश्वरांची रचना असलेल्या गीताने झाली. यानंतर अरे अरे ज्ञाना झालासी पावन… अवचिता परिमळू… ऊस डोंगा परी भाव नोहे डोंगा… या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या रचनांच्या सादरीकरणाने रसिक भक्तीरसात न्हाऊन निघाले. माजे रानी माजे मोगा… या शांता शेळके यांची रचना असलेल्या महानंदा चित्रपटातील गीताच्या सादरीकरणाने पं. ह्रदयनाथ मंगेशकर आणि राधा मंगेशकर यांनी कोकणी भाषेतील गोडवा रसिकांसमोर उलगडला.

माझ्या सारंगा राजा सारंगा… या कोकणातील समुद्र आणि पौर्णिमेच्या चांदण्यांचे वर्णन असलेल्या गीताच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरुन दाद दिली. असा बेभान हा वारा… तिन्ही सांजा सखे मिळाल्या या गीतांच्या सादरीकरणाने विभावरी आपटे यांनी रसिकांची मने जिंकली. आयेगा आयेगा आयेगा आनेवाला… या गीताने रसिकांची विशेष दाद मिळविली. केदार परांजपे, विवेक परांजपे (सिंथेसायझर), अमर ओक (बासरी) यांनी साथसंगत केली.

Share
This