Dagdusheth_Ganpati_Dhundiraj_Pathaki_125Year

प. पू. धुंडीराज पाठक

एकरुप होऊन गणेशाची उपासना करा

प. पू. धुंडीराज पाठक: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त सत्संग कार्यक्रम

पुणे: कोणत्याही देवाचे मनन करताना तो आणि मी वेगळे नाही, या भावनेने पूजा करणे गरजेचे आहे. जेव्हा माणसाच्या मनात देखील दैवत्व येईल, तेव्हा द्वैत संपून अद्वैताचा प्रवास सुरु होईल. देवाचे सारखे नाव घेतल्याने देव प्रसन्न होतो, असे नाही. तुम्ही एकदाच देवाचे नाव घ्या पण ते मनापासून घेतले तर ते देवाला जास्त आवडेल, असे विचार प. पू. धुंडीराज पाठक यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सत्संग कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. गणेश कला क्रीडा मंच येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी गणेश महात्म्याविषयी महत्त्व कथन केले.

धुंडीराज पाठक म्हणाले, घरातील गणपती बसविताना भव्यदिव्य मूर्तीपेक्षा लहान मूर्ती आणावी कारण त्यातच खरे दैवत्व असते. भव्यदिव्यता कार्यात असावी, मूर्तीत असणे गरजेचे नाही. गणपतीच्या दहा दिवसांच्या कालावधीत घरातील वातावरण प्रसन्न ठेवावे. गणपतीची पूजा करताना माणसाच्या मनात वेगळे विचार आले तर त्याला दैवत्व येत नाही. देवाची पूजा मन शुद्ध, पवित्र, शांत ठेवून करणे गरजेचे आहे.

ते पुढे म्हणाले, गणपती पासून सगळे निर्माण झाले आहेत. सगळ्या देवांनी गणेशाची आराधना केली आहे. तसेच अनेक देवतांनी विविध ठिकाणी गणपतीची स्थापना केली आहे. संतांनी देखील गणपती आद्य देव असल्याचे सांगितले आहे. गणपती ही बुध्दीदेवता, सिध्दीदेवता असल्यामुळे तिची उपासना करा मनातील इच्छा पूर्ण होतील. आपले चित्त स्थीर करण्यासाठी गणेशाची उपासना करणे आवश्यक आहे.

स्वामीनारायण मंदिराचे प. पू. भक्तीप्रिय स्वामीजी महाराज म्हणाले, परमेश्वराने आपल्याला मनुष्य जन्म दिला आहे. त्यामुळे देवाने सांगितलेल्या आदर्शांचे आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. परमेश्वराने सांगितलेल्या मार्गाचा अवलंब केला आणि त्याची प्रार्थना केली तर जीवन शुध्द होते. धर्म, त्याग, वैराग्य, भक्ती हे परमेश्वराने सांगितलेले मार्ग आहेत. आपल्या दु:खांपासून मुक्त होण्यासाठी परमेश्वराची भक्ती करा तो नक्कीच योग्य मार्ग दाखवेल

Share
This