Dagdusheth_Ganpati_Shourya_Gaurav_Samaroh_125Year_1

१२५ वीरमाता, पिता, वीरपत्नींचा शौर्यगौरव

सैनिकांचे प्राण वाचवून शहिदांची संख्या शून्य करण्याचा प्रयत्न

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचे प्रतिपादन ; स्वातंत्र्यदिनी १२५ वीरमाता, पत्नींचा सन्मान श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन

पुणे : भारताच्या सीमा मोठया असून सगळ्या ठिकाणी आपले सैनिक तैनात आहेत. परंतु भौगोलिक परिस्थितीमुळे त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. सैनिक हा पगाराकरीता काम करीत नाही. तर, देशांतर्गत आणि सिमेवर मोठया प्रमाणात होणा-या घुसखोरीला पायबंद घालून भारतमातेचे रक्षण करण्याकरीता सज्ज असतो. शत्रूला रोखताना अनेकांना बलिदान द्यावे लागते. त्यामुळे सैनिकांचे प्राण जावू नये, याकरीता सरकारतर्फे आधुनिक यंत्रणा वापरण्यात येणार असून शहिदांची संख्या शून्य व्हावी यासाठी सरकारचे मोठया प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त स्वातंत्र्यदिनी १२५ वीरमाता, पिता, वीरपत्नींचा शौर्यगौरव समारोह गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला. यावेळी सदर्न कमांड मुख्यालय पुणेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रेमंड नरोन्हा, कर्नल संभाजी पाटील (निवृत्त), कर्नल सुरेश पाटील (निवृत्त), अंकुश काकडे, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, सुनिल रासने, माणिक चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमात भारतीय सैन्यातील १०० आणि नक्षलवादी भागातील २५ शहिदांच्या एकूण १२५ वीरमाता व वीरपत्नींचा गौरव करण्यात आला. प्रत्येकी २५ हजार रुपये, साडीचोळी आणि सन्मानचिन्ह असे सन्मानाचे स्वरुप होते. यावेळी ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेल्यांचे अनुभव असलेल्या थँकू बाप्पा या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

हंसराज अहिर म्हणाले, नक्षलवाद ही देशाला लागलेली कीड आहे. यामध्ये तरुणाई नाहक ओढली जात आहे. तरुणाईला कोणतीही दिशा नाही. आदिवासिंना घेऊन आपल्याच लोकांवर बंदूका उगारल्या जात आहेत. सध्या नक्षली विचार शहरातील महाविद्यालयांमध्ये पसरत असून यापासून तरुणांनी सावधान रहायला हवे. चीन जरी आपल्या समोर उभा ठाकला, तरीही आपल्यामध्ये चीनला रोखण्याची ताकद आहे. त्यामुळे जे सैनिक देशाचे रक्षण करतात, त्यांचे स्मरण आपण कायम ठेवायला हवे.

रेमंड नरोन्हा म्हणाले, शत्रूशी लढताना जे सैनिक शहीद होतील, त्यांच्या कुटुंबाची देखभाल भारतीय नागरिक करतील, हा विश्वास निर्माण करायला हवा. यामुळे लष्कराचे मनोधैर्य वाढणार असून त्यासाठी आपण सर्वांनी पुढे यायला हवे.

सन्मानाला उत्तर देताना वीरपत्नी दिपाली मोरे म्हणाल्या, समाजाचा पाठिंबा हेच आमच्यासाठी बळ आहे. सध्या दहीहंडयांवर लाखो रुपयांची बक्षिसे दिली जात आहेत. त्यापेक्षा शहीद सैनिकांच्या कुटुंबाना दहीहंडीला बोलावले, तरी चांगला संदेश समाजात जाणार आहे. गडचिरोलीच्या वीरमाता वेणूताई बंडेवार म्हणाल्या, शासनाने आम्हाला खूप काही दिले आहे. परंतु समाजाकडून दखल घेतली जाणे, आम्हाला बळ देणारे आहे.

अशोक गोडसे म्हणाले, स्वराज्य आणि स्वातंत्र्याला बळकटी यावी, यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. शहीदांच्या कुटुंबियांची आठवण आणि सन्मान करणे, हे प्रत्येक भारतवासियाचे कर्तव्य असून ट्रस्टच्या माध्यमातून यापुढेही आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहू, असेही ते म्हणाले. कर्नल संभाजी पाटील, अंकुश काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. हेमंत रासने यांनी स्वागत केले. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

Share
This