Dagdusheth_Ganpati_Shankar_Abhyankari_125Year

प. पू. वाचस्पती शंकर अभ्यंकर

भगवंतांच्या प्रत्येक लिलेत अर्थ दडलेला

प.पू. वाचस्पती शंकर अभ्यंकर: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त सत्संग कार्यक्रम

पुणे : भगवान श्रीकृष्णाच्या लिला अद्भुत आहेत. भगवंतांनी आपल्या प्रत्येक लिलेमध्ये काहीतरी संदेश दिला आहे. भगवंतांनी केलेली लिला डोळ्यांना वेगळ्याप्रकारे दिसते. परंतु त्या लिलेच्या अंतरंगातील अर्थ वेगळाच असतो. आपल्या प्रत्येक लिलेतून भगवंतांनी माणसाचे आचरण कसे असावे हे शिकवले आहे. त्यामुळे भगवंतांनी केलेल्या लिलांचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा, असे प. पू. वाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी सांगितले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सत्संग कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. गणेश कला क्रीडा मंच येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी श्रीकृष्ण चरित्र, श्रीकृष्णाच्या लिला याविषयी महत्त्व कथन केले.

प.पू. शंकर अभ्यंकर म्हणाले, भगवंतांनी गोपिकांची वस्त्रे लपविली. या लिलेमध्ये वस्त्र कोणती आहेत, हे समजून घ्यायला हवे. जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये अज्ञानाचे वस्त्र आहे आणि ते भगवंतांनी पळविले. भगवंतांनी विठ्ठलाचे रुप घेतले आणि ते पंढरपूरला विसावले, असे संतांनी सांगितले. त्यामुळेच पांडुरंग समचरणी असून तो कधी डावे-उजवे करीत नाही. विठ्ठल हा सगळ्यांचा देव असून तो सगळ्यांना आपलासा वाटतो.

कालियामर्दना विषयींची लिला सांगताना ते पुढे म्हणाले, कालियामर्दन ज्याप्रमाणे यमुनेच्या डोहात बसून पाण्यात विष पसरवत होता. त्याचप्रमाणे माणसाच्या मनात देखील वाईट विचारांचा कालिया बसलेला असतो. ज्याप्रमाणे भगवंतांनी कालिया नागाला वाईट कृती करण्यापासून रोखले. त्याप्रमाणे माणसाने देखील भगवंतांच्या विचारांचे स्मरण करून वाईट विचारांना परतवून लावले पाहिजे.

Share
This