Dagdusheth_Ganpati_Sadhana_Sargam_125Year

साधना सरगम म्युझिकल नाईट

रसिकांनी अनुभविला चित्रपट गीतांचा अनमोल नजराणा

साधना सरगम आणि राहुल सक्सेना यांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव

पुणे : गुंजी सी हे सारी फिजा… चंदा रे चंदा रे… दमादम मस्त कलंदर… पिया रे पिया रे… अशा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या हिंदी चित्रपट गीतांचा अनमोल नजराणा पुणेकरांनी अनुभविला. हिंदी चित्रपट गीतांसह मराठी चित्रपटातील नव्या दमाची गीते सादर होताच प्रेक्षकांनी सभागृह अक्षरश: डोक्यावर घेतले. प्रख्यात गायिका साधना सरगम आणि राहुल सक्सेना यांनी सादर केलेल्या गीतांवर श्रोत्यांनी ठेका धरत संगीताचा मनमुराद आनंद लुटला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये साधना सरगम म्युझिकल नाईट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

खेळ मांडला… या मराठी गीतासह में तेनू समझावा की…मितवा यांसारख्या लोकप्रिय हिंदी गीतांनी राहुलने कार्यक्रमाची दमदार सुरुवात केली. गीतांची सुरेल पेशकश आणि तितक्याच तोडीचे वाद्यवृदांचे वादन अनुभवित रसिकांनी सर्वच कलाकारांना भरभरुन दाद दिली. साधना सरगम यांनी गजानना श्री गणराया… इश गजानन करीती नर्तन… यांसारख्या गणेशाची स्तुती करणारी भक्तीगीते देखील सादर केली.

कल्याणजी आनंदजी यांचे नीले नीले अंबर पे… या गीताची खास पेशकश झाली. पेहेला नशा पेहेला खुमा… आणि जब कोई बात बिगड जाए… या उपस्थितांनी केलेली फर्माईश पूर्ण करीत कलाकारांनी पुणेकरांची मने जिंकली. हर किसीको नही मिलता… चुपके से लगजा लगे… या प्रसिद्ध चित्रपट गीतांसह विविध गाण्यांच्या मुखडयांची मेलडी रसिकांच्या विशेष पसंतीस उतरली. दोन्ही दिग्गज कलाकारांचा प्रवास यावेळी रसिकांसमोर कार्यक्रमातून उलगडला गेला. मंजिरी जोशी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

Share
This