Dagdusheth_Ganpati_Sunildada_kale_125Year

प. पू. डॉ. सुनीलदादा काळे

पर्यावरणात दडले परमेश्वराचे तत्व

प.पू.डॉ. सुनीलदादा काळे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त प्रवचन कार्यक्रम

पुणे: झाडांचे संगोपन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्या संस्कृतीत झाडांचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले आहे. प्रत्येक देवाचे एक झाड आहे. भगवान शंकरांसाठी बेल, गणेशासाठी जास्वंद असे प्रत्येक देवाकरीता झाडाचे महत्त्व आहे. परमेश्वराच्या कृपेसाठी लोक झाडांचे संगोपन करतात आणि ती वाढवितात, म्हणून आज आपल्या आजुबाजूला झाडे टिकून आहेत. त्यामुळे पर्यावरणात दडलेल्य परमेश्वराच्या तत्त्वाचे आपण जतन करायला हवे, असे विचार प. पू. डॉ. सुनीलदादा काळे यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रवचनात त्यांनी मार्गदर्शन केले. गणेश कला क्रीडा मंच येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी भगवान गणेश व गुरुदेव दत्ताची महती, पर्यावरणातील परमेश्वराचे तत्व, मन आणि शरीर या विषयीचे महत्त्व त्यांनी कथन केले.

प.पू.डॉ. सुनीलदादा काळे म्हणाले, मातीच्या प्रत्येक कणात गणेशाचे तत्व आहे, म्हणून आपण गणेशोत्सवात गणेशाची मूर्ती मातीपासून तयार करतो आणि ती पाण्यात विसर्जित करतो. परंतु आज आपण प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती आणून त्या पाण्यात विसर्जित करीत आहोत आणि मातीसह नदीचे प्रदूषण करीत करतो. माणसाने केलेल्या अशा वेगवेगळ््या गोष्टींमुळे पर्यावरणचा समतोल बिघडत आहे. प्रत्यक्षात आपल्या आजूबाजूच्या प्रकृतीचे रक्षण करणे म्हणजेच परमेश्वराची खरी भक्ती आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्याकरीता प्रत्येकाने पुढे यायला हवे.

ते पुढे म्हणाले, मा आणि उदक या दोन संस्कृत शब्दांपासून मोदक हा शब्द तयार झाला. उदक म्हणजे पाणी. भगवान गणेश जेव्हा आपल्यावर कृपा करतात, तेव्हा ते पाण्याचा प्रसाद आपल्याला देतात. परंतु तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की, शरीराचा समतोल बिघडतो. तसेच जेव्हा आपण वाईट विचार करतो, तेव्हा मनाचे विकार होतात आणि त्या मनाच्या विकारांमुळे शरीराचे विकार होतात. त्यामुळेच भगवंताने दिलेला प्रसाद म्हणजेच आपल्या देहाची काळजी घेतली पाहिजे.

Share
This