Dagdusheth_Ganpati_Rugna_Seva_Abhiyan_125Year_13_8_2

जय गणेश रुग्ण सेवा

व्यायामाचा अभाव व फास्ट फूडमुळे ह्रदयरोगाचे आजार

प्रख्यात ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ.सुनील साठे यांचे प्रतिपादन; जय गणेश रुग्ण सेवा अभियानात विनामूल्य शिबीर

पुणे : आजच्या धकाधकीच्या जीवनात कमी वयातील लोकांना ह्रदयरोगाचे प्रमाण बळावत आहेत. यापूर्वी वयवर्षे ६० ते ७० यावयात आणि वजन जास्त असल्याने हा आजार होत होता. परंतु आता मध्यम वयातील लोकांना ह्रदयरोग होत आहे. व्यायामाचा अभाव, जंक फूड, सिगारेट, तंबाखू यामुळे ह्रदयरोगासंबंधी आजार होत आहे. त्यामुळे ह्रदयरोगाविषयी मोठया प्रमाणात जनजागृतीची आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रख्यात ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ.सुनील साठे यांनी केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय जय गणेश रुग्ण सेवा अभियानात हर्डीकर हॉस्पिटलच्यावतीने मोफत ह्रदयरोग तपासणी व ह्रदयशस्त्रक्रिया शिबीराच्या निमित्ताने ते बोलत होते. गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, डॉ.बाळासाहेब परांजपे, महेश सूर्यवंशी, सुनिल रासने, ह्रदयरोगतज्ञ डॉ.आशिष त्रिवेदी, डॉ. विवेक जगताप, हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक घोणे यांसह दगडूशेठ ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते.

डॉ.सुनील साठे म्हणाले, शिबीरात १९१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी रुग्णांची ईसीजी तपासणी करण्यात आली असून एंजिओग्राफी सवलतीच्या दरात आणि शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहे. ह्रदयविकारापासून दूर राहण्याकरीता संतुलित आहार व व्यायाम गरजेचा आहे. त्यामुळे याविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. शिबीरात ६ जणांच्या टिमने रुग्णांची तपासणी केली.

धनकवडी येथील भारती हॉस्पिटल येथे मोफत एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करून देण्याची सुविधा दि. ५ सप्टेंबर पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीकरीता मो. ९८८१४१८४५० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share
This