Dagdusheth_Ganpati_Babasaheb_Taranekar_125Year

प. पू .डॉ श्री बाबासाहेब तराणेकर

सोहम् साधनेने होते गणेशाचे दर्शन

प.पू.डॉ.बाबासाहेब तराणेकर: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त सत्संग कार्यक्रम

पुणे : गणेशाची विविध रुपे आहेत. परंतु माऊलींना जे गणेशाचे स्वरुप दिसले ते म्हणजे सोहम् स्वरुप. सोहम् हा शब्द नाथसंप्रदायातून आला आहे. गणेश हा नादब्रह्म असून माणसाच्या चराचरात गणेशाचे आत्मस्वरुप आहे. संतांनी देखील सोहम् साधनेतून गणेशाची अनुभूती घेतली आहे. त्यामुळे सोहम् साधनेतून आपल्या सर्वांना गणेशाचे दर्शन होईल, असे प.पू.डॉ.बाबासाहेब तराणेकर यांनी सांगितले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सत्संग कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. गणेश कला क्रीडा मंच येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी गणेशाची रुपे, संतांना दिसलेले गणेशाचे स्वरुप याविषयी महत्त्व कथन केले.

डॉ. बाबासाहेब तराणेकर म्हणाले, संतांनी सोहम् साधना केली, त्यातून त्यांना अनुभूती झाली आणि त्यांच्या दृष्टीस जे दिसले ते म्हणजे आत्मरुपी गणेश. सोहम् हा एक नाद आहे. अनेकांना गणेशाच्या वेगवेगळ्या रुपाची अनुभूती झाली. काहींना ओंकार स्वरुपात, काहींना गं स्वरुपात तर काहींना इष्टदेवतेच्या स्वरुपात गणेशाचे दर्शन झाले.

ते पुढे म्हणाले, गणेशाच्या विविध रुपांप्रमाणेच त्याचे उपासक देखील विविध ठिकाणी आढळतात. महाराष्ट्राप्रमाणेच दक्षिणेकडे देखील गणेशाचे उपासक आहेत. दक्षिणेत गणेशाची अनेक मंदिरे असून त्यांच्या वेगवेगळ्या कथा आहेत. धुंडीराज विनायक काशी क्षेत्रात विशेष प्रसिद्ध आहे. गणपती शद्बातील गण म्हणजे एका समुहाचा अधिपती. आपण सगळे गर्भातून आलो आहोत. परंतु गणपती स्वयंभू आहे. गणपतीच्या आराधनेने मनातील वाईट विचार, संकल्प शुद्ध होतात, असेही ते म्हणाले.

Share
This