Dagdusheth_Ganpati_Vijendarsinghji_Maharaj_125Year

प.पू. विजेंदरसिंग महाराज

सर्व धर्मग्रंथांमध्ये जगण्याचे एकच शास्त्र

प.पू. विजेंदरसिंग महाराज: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त सत्संग कार्यक्रम

पुणे: विष्णू, अल्ला, येशू, विठ्ठल हे एकाच परमेश्वराचे अनेक अवतार आहेत. समाजामध्ये माझा धर्म मोठा, असे म्हणून अनेक भांडणे होतात. अनेकांचे जीवन यामध्ये व्यर्थ होते. बायबल, कुराण, भगवद्गीता या सर्व धर्मग्रंथामध्ये जगण्याचे एकच शास्त्र दिले आहे. त्यामुळे हा भेद संपविण्यासाठी आणि संपूर्ण भारतवर्षाला एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली, असे विचार नांदेड गुरुद्वाराचे प.पू. विजेंदरसिंग महाराज यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सत्संग कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. गणेश कला क्रीडा मंच येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी गुरुनानक साहब आणि गुरुगोविंदसिंग महाराज यांचा एकतेचा संदेश सत्संगातून कथन केला.

विजेंदरसिंग महाराज म्हणाले, भारताची संस्कृती, परंपरा वाचविण्यासाठी गुरु गोविंदसिंग यांनी बलिदान दिले. त्यांच्या विशाल ज्ञानाने त्यांनी ग्रंथ लिहीले. परमेश्वराच्या भावाचा, त्याच्या ज्ञानाचा अंत नाही. त्याने बनविलेल्या सृष्टीचा देखील अंत नाही. कीर्तन, सत्संग आणि प्रवचनाच्या माध्यमातून आत्मा तृप्त होतो. भगवंत सत्संगाने प्रसन्न होतात, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, गणेशोत्सव सुरु करण्यामागे लोकमान्य टिळकांचा मोठा विचार होता. पाप नष्ट करणारे गणपती बाप्पा आहेत. देवतांच्या हातून देखील जे चुकीचे घडते, त्यांना गणपती बाप्पा नष्ट करतात. गणेश हा बुद्धीचा दाता आहे. त्याची उदाहरणे पुराणात आहेत. त्यामुळे त्याचे पूजन आपण मनोभावे करायला हवे.

Share
This