Dagdusheth_Ganpati_Govindgiri_Maharaj_125Year

आचार्य गोविंदगिरी महाराज

देवाच्या विविध रुपांतील एकत्त्वाचा वेध म्हणजे धर्मतत्त्व

आचार्य गोविंदगिरी महाराज: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त सत्संग कार्यक्रम

पुणे: मूळ परमात्मा एकच असला, तरी त्याची अनंत रुपे आहेत. सर्व रुपांमध्ये एकच ब्रह्मचैतन्य आहे. परंतु माणूस आपापल्या भावनांप्रमाणे त्या परमात्म्याला पाहण्याची इच्छा ठेवतो. परमात्मा सर्व शक्तीमान असल्याने भक्ताला त्या त्या रुपामध्ये दर्शन देतो. परंतु या सर्व रुपांमधून ज्याला एकत्त्वाचा वेध घेता आला, त्याला धर्मतत्व कळते. उपासनेचे महत्त्व देखील याच माध्यमातून कळते, असे विचार आचार्य गोविंदगिरी महाराज यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सत्संग कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. गणेश कला क्रीडा मंच येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी गणेशाची रुपे, माणसाची भूमिका याविषयी महत्त्व कथन केले.

गोविंदगिरी महाराज म्हणाले, आपण करीत असलेली भगवंताची उपासना ही ज्ञानाधिष्ठीत असायला हवी. ज्ञानावर अधिष्ठान ठेऊन केलेले कार्य मनापासून केलेले असते. आपण मूर्तीची पूजा करतो, म्हणजे नक्की काय असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. परंतु ती फक्त मूर्तीची पूजा नसते, तर मूर्तीच्या अधिष्ठानाने केलेली भगवंताची पूजा असते. देवाचे जे रुप आपल्याला आवडले, त्याची आराधना करण्याची मुभा केवळ सनातन धर्मात असून ही वैशिष्टयपूर्ण बाब आहे.

ते पुढे म्हणाले, आज देशाला जे अच्छे दिन आले आहेत, त्याची बीजे गणेशोत्सवात आहेत. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती या दोन उत्सवांची जनमानसामध्ये सुरुवात केल्याने देशाचे वातावरण बदलून गेले. गणेशाची आराधना करणे हा तेजस्वी विषय आहे. शुभ आणि लाभ या दोन्ही गोष्टी माणसाला एकत्रितपणे प्रदान करणारी देवता म्हणजे गणपती. त्यामुळे आता वेगळ्या दिशेने देश भरारी घेत असताना भागवत, महाभारत आणि रामायणाप्रमाणे मोठया प्रमाणात गणेश कथेचे प्रवचन व्हायला हवे.

Share
This