Baba_Maharaj_Satarkar_125Year_6

ह.भ.प. बाबामहाराज सातारकर

ऐक्याचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय

ह.भ.प. बाबामहाराज सातारकर : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त चार्तुमास कीर्तन

पुणे: सध्या समाजात जाती-धर्माचे राजकारण होताना दिसते. जाती-धर्मापेक्षा ऐक्याची भावना आपल्या मनात असली पाहिजे. वारकरी संप्रदाय हा ऐक्याचा संदेश देणारा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायाने देहाची जात पाहिली नाही तर अंत:करणाची जात पाहिली आहे. या संप्रदायाचा पाया म्हणजे ज्ञानोबाराया तर कळस म्हणजे तुकोबा आहेत. सर्व जाती-धर्माचे लोक एकत्रित करून ज्ञानोबांनी या संप्रदायाचा पाया रचला. वारकरी परंपरेत काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाचा समारोप होतो. हे कीर्तन सामाजिक ऐक्यासाठी केले जाते, असे ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांनी सांगितले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित चार्तुमास कीर्तन महोत्सवात सातारकर यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावर निरुपण केले. गणेश कला क्रीडा मंच येथे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगातून वारकरी संप्रदाय आणि काल्याच्या कीर्तनाविषयीचे महत्त्व कथन केले.

प.पू. बाबामहाराज सातारकर म्हणाले, सध्या राजकारणात, समाजकारणात जाती-धर्मावरून वाद होतात. समाजातील लोकांना एकत्रित आणा, असे राज्य घटनेत सांगितले आहे. परंतु जे राजकारण्यांना करता आले नाही ते वारकरी संप्रदायाने करून दाखविले. वारीच्या परंपरेतून अनेक जाती-धर्माचे लोक एकत्रित येतात. त्यावेळी ते जात-धर्म बघत नाही तर फक्त विठूरायाच्या चरणी लीन होतात.

ते पुढे म्हणाले, जगाच्या पाठीवर भगवत गीता एकदाच लिहीली गेली, इथेच तत्वज्ञानाची उंची दिसते. माणसांतील द्वेष-मत्सर दूर व्हावा याकरीता संतांनी तत्वज्ञान सांगितले. परमेश्वर आपल्यावर कृपा करतो हे लक्षात ठेवा परंतु त्या कृपेची परीक्षा घेऊ नका. आपल्या मुखी हरी नाम आणि कंठी तुळशीची माळ आहे, तर तो प्रसाद आणि परमेश्वराने दिलेले हे आयुष्य म्हणजे त्याची कृपा आहे असे समजा.

Share
This