Sarod_Vadan_125Year

सरोद वादना

पं. अमान अली व अयान अली बंगश यांचे सरोदवादन, पं.सत्यजित तळवलकर यांचे तबलावादन श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव

पुणे : बंगाल, आसाम प्रांतातील लोकसंगीताचा बाज सरोदवादनातून उमटला आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यावर ठेका धरला. भारतीय संगीत क्षेत्रातील दोन युवा दिग्गज पं.अमान अली व अयान अली बंगश यांच्या सरोद वादनाला तबल्याची सुरेख साथ देणा-या पं.सत्यजित तळवलकर यांनी देखील आपल्या वादनातून प्रेक्षकांची मने जिंकली. सरोद, तबल्यातून घुमणारा नाद व अनोखी जुगलबंदी आपल्या डोळ्यामध्ये साठवित शास्त्रीय आणि लोकसंगीताचा मिलाफ पुणेकरांनी अनुभविला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सरोदवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

वाद्यमैफलीचा प्रारंभ श्री रागातील झपताल व तीनतालातील बंदिशींनी झाला. दोन्ही दिग्गजांनी बोटाच्या नखाच्या टोकाने सरोदवादनात होणारे निरनिराळे मनोहारी आवाज देखील सादर केले. मन प्रसन्न करणा-या सरोदवादनाला उपस्थितांची वाहवा मिळत होती. तिलंग तालातील विलंबित तीनताल पेश करण्याच्या रसिकांच्या फर्माईशीला या कलाकारांनी प्रतिसाद देत सुरेख वादन सादर केले.

उत्तरोत्तर रंगलेल्या मैफलीत देस राग आणि भटियार रागातील बंगाल, आसाम सारख्या भागातील लोकसंगीत सरोद व तबल्याच्या साथीने सादर झाले. भारतीय संस्कृतीतील निराळ्या संगीताला रसिकांनी उर्त्फूत दाद दिली. दाक्षिणात्य संगीतामधील किरवानी रागाच्या सादरीकरणाने मैफलीची सांगता झाली. पं.सत्यजीत तळवलकर आणि प्रसाद पाध्ये यांनी तबल्याची साथसंगत केली.

Share
This