Rugna_Seva_Abhiyan_30-7_125Year_1

रुग्ण सेवा अभियान

जय गणेश रुग्ण सेवा अभियान

दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे ‘जय गणेश रुग्ण सेवा’ अभियानात विनामूल्य शिबीर

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे आयोजित आरोग्य शिबीरात २५१ गरजू रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये श्वसनाचे विकार, स्रीरोग, बालरोग, शल्यचिकीत्सा, कान- नाक – घसा, हाडांचे आजार, त्वचारोग, डोळ्यांचे विकार यासंबंधी रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर, ३५ रुग्णांना रुग्णालयात पुढील सर्व उपचार विनामूल्य दिले जाणार आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय जय गणेश रुग्ण सेवा अभियानात विनामूल्य शिबीराचे उद्घाटन झाले. गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या कार्यक्रमात डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेजच्या कम्युनिटी मेडिसीन डिपार्टमेंटचे प्रा. डॉ. एस. एल. जाधव, रामदास गायकवाड, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, डॉ. बाळासाहेब परांजपे, सुनिल रासने यांसह विश्वत उपस्थित होते. अभियानात पुण्यातील नामांकित रुग्णालये व तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग आहे. रविवार, दिनांक ६ आॅगस्टपर्यंत दर रविवारी सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत गरजू व गरीब रुग्णांकरीता मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. एस. एल. जाधव म्हणाले, आरोग्य शिबीरात हाडांचे आजार आणि डोळ्यांच्या विकाराचे प्रमाण अधिक दिसून आले. हाडांच्या विकारांमध्ये अंगदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी अशाप्रकारच्या आजारांचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळले. तसेच डोळ्यासमोर अंधारी येणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे अशा डोळ्यांच्या विकारांचे प्रमाण देखील अधिक असल्याचे दिसले. पुढील उपचारांसाठी ३५ गरजू रुग्णांना डी. वाय. पाटील रुग्णालयात मोफत उपचार दिले जाणार आहेत. शिबीरात ३९ डॉक्टर्सनी सहभाग घेत तपासणी केली.

ट्रस्टतर्फे रविवार, दिनांक ६ आॅगस्ट रोजी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सुनील साठे हे मोफत हृदयरोग तपासणी आणि सर्व प्रकारच्या हृदयशस्त्रक्रिया एंजिओप्लास्टी या सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. पुण्यातील नामांकित रुग्णालांचा या अभियानात सहभाग असून अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. पराग संचेती हे संचेती हॉस्पिटल येथे मोफत अस्थिरोग तपासणी आणि सवलतीच्या दरात जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करणार आहेत. तसेच धनकवडी येथील भारती हॉस्पिटल येथे मोफत एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करून देण्याची सुविधा दि. ५ सप्टेंबर पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीकरीता मो. ९८८१४१८४५० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share
This