Rugna_Seva_Abhiyan_125Year_5

रुग्ण सेवा अभियान

जय गणेश रुग्ण सेवा अभियान

अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांचे प्रतिपादन; दगडूशेठ तर्फे जय गणेश रुग्ण सेवा अभियानात विनामूल्य शिबीर

पुणे : एखाद्या देवस्थानाबद्दल अनेकांच्या मनात नानाविध प्रश्नचिन्हे निर्माण होतात. परंतु या सर्व प्रश्नचिन्हांना आपल्या सामाजिक उपक्रमांच्या उद््गारचिन्हातून ट्रस्टने उत्तर दिले आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्ट वादविवाद नसलेला आणि सर्वांना आदर वाटेल, असा ट्रस्ट आहे. ट्रस्टच्या माध्यमातून सुरु असलेल्या सामाजिक कामांचा पुणेकरांना अभिमान असून देवसेवेपासून ते मानवसेवेपर्यंत ट्रस्टची वाटचाल जगातील कानाकोप-यात पोहोचेल, असे प्रतिपादन अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांनी केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय जय गणेश रुग्ण सेवा अभियानात विनामूल्य शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या कार्यक्रमात होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ.संजीव डोळे, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, डॉ.बाळासाहेब परांजपे, महेश सूर्यवंशी, सुनिल रासने यांसह विश्वत उपस्थित होते. अभियानात पुण्यातील नामांकित रुग्णालये व तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग आहे. रविवार, दिनांक ६ आॅगस्टपर्यंत दर रविवारी सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत गरजू व गरीब रुग्णांकरीता मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

डॉ.संजीव डोळे म्हणाले, बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांमध्ये विविध आजारांचे प्रमाण दिसून येते. योग्य वेळी उपचार व तज्ज्ञांचा सल्ला न घेतल्याने आजार बळावतात. आरोग्य शिबीरात रक्त व शर्करा तपासणी करीता ९०, नियमीत तपासणीकरीता ४५० विद्यार्थी, इतर तपासण्यांकरीता ६५० जणांनी सहभाग घेत आरोग्य सेवांचा लाभ घेतला. याशिवाय प्रामुख्याने आहार, मुद्रा व योगा चिकित्साकरीता ७० जणांनी उपचार घेण्यास सुरुवात केली. संधीवात, दमा आणि स्त्रियांचे विविध आजार यावेळी सहभागी रुग्णांमध्ये दिसून आले. शिबीरात १८ डॉक्टर्सनी सहभाग घेत तपासणी केली.

ट्रस्टतर्फे रविवार, दिनांक ३० जुलै रोजी सर्व प्रकारांच्या आजारांवर तपासणी व मोफत शस्त्रक्रिया, उपचार पिंपरी-चिंचवडमधील डी.वाय.पाटील रुग्णालयातर्फे करण्यात येणार आहेत. तसेच रविवार, दिनांक ६ आॅगस्ट रोजी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सुनील साठे हे मोफत हृदयरोग तपासणी आणि सर्व प्रकारच्या हृदयशस्त्रक्रिया एंजिओप्लास्टी या सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.

पुण्यातील नामांकित रुग्णालांचा या अभियानात सहभाग असून अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. पराग संचेती हे संचेती हॉस्पिटल येथे मोफत अस्थिरोग तपासणी आणि सवलतीच्या दरात जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करणार आहेत. तसेच धनकवडी येथील भारती हॉस्पिटल येथे मोफत एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करून देण्याची सुविधा दि. ५ सप्टेंबर पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीकरीता मो. ९८८१४१८४५० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share
This