Bollywood_125Year

तबला, बासरी, कथकची जुगलबंदी

तबला, बासरी, कथकची जुगलबंदी

पं.विजय घाटे, अमर ओक यांचे सादरीकरण ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर महोत्सव

पुणे : तबला, बासरी, गिटार वादनातून बॉलिवुडमधील जुन्या चित्रपट गीतांपासून ते तरुणाईच्या ओठांवर असलेल्या नव्या गाण्यांपर्यंतचा सुरेल सांगितीक प्रवास रसिकांनी अनुभविला. पं.विजय घाटे यांची बोटे तबल्यावर फिरल्यानंतर निघणारा सुमधूर नाद आणि अमर ओक यांच्या बासरीवादनातून श्रोत्यांनी पारंपरिक व फ्युजन संगीताचा मनमुराद आनंद लुटला. गायन, वादनासोबतच कथक नृत्यसादरीकरणाला रसिकांनी दाद दिली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये बियॉंड बॉलिवुड हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कृष्णाय वासुदेवाय… या गाण्याने मैफलीला सुरुवात झाली. हिरो धून, दो लब्जो की है, नटनागरा अतिसुंदरा यांसारख्या मनोहारी गीतांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. पुराणातील पात्र रुपेरी पडद्यावर जेव्हा दिसू लागली, त्याकाळातील संगीत आणि गाण्यांच्या सादरीकरणाला श्रोत्यांनी उर्त्स्फूत दाद दिली. अमरप्रेम या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या बडा नटखट है, कृष्ण कन्हैया… या गीताच्या सादरीकरणाच्या वेळी कथक नृत्याविष्कार सादर झाला. त्यामध्ये माखन चोरीसारखे नानाविध प्रसंग सादर करण्यात आले.

कथक नृत्याविष्कार सादरीकरणाच्यावेळी घुंगरु आणि तबल्याची अनोखी जुगलबंदी रसिकांनी अनुभविली. त्यानंतर पहाडी रागातील नानाविध रचना सादर करीत कलाकारांनी रसिकांची मने जिंकली. रितेश ओहोळ (गिटार), अनय गाडगीळ (सिंथेसायझर), सुरंजन खंडाळकर (गायन), शितल कोलवलकर (नृत्य), अभिजीत बधे यांनी साथसंगत केली. मिलींद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

Share
This