Shikharnad_125Year

झेंबे आणि किबोर्ड वादनातून उमटला ‘शिखरनाद’

तौफिक कुरेशी, अभिजीत पोहनकर यांचे सादरीकरण ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव

पुणे : भारतीय अभिजात संगीताची पाश्चात्य वाद्यांवर पेशकश करीत नवनवीन नाद साकारत, झेंबे आणि किबोर्डच्या जुगलबंदीतून शिखरनाद उमटला. नानाविध राग, ताल आणि नव्या धून सादर करणा-या संगीत क्षेत्रातील दोन दिग्गजांच्या कलेला रसिकांनी भरभरुन दाद दिली. यावेळी पाश्चात्य वाद्यांतून उमटणारा भारतीय संगीताचा सुरेल आवाज ऐकण्यात श्रोते तल्लीन झाले होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शिखरनाद हा तौफिक कुरेशी आणि अभिजीत पोहनकर यांचा सांगितीक कार्यक्रम झाला.
पुरीया धनश्री आणि श्री रागातील रचनांच्या सादरीकरणाने या मैफलीला प्रारंभ झाला. झपतालातील गत आणि तीनतालात तौफिक कुरेशी यांच्या एकल वादनाला पुणेकरांनी टाळ्यांच्या कडकडाट दाद दिली. झेंबेमधून ढोल-ताशांचे निनाद घुमू लागल्यानंतर गणेशोत्सवातील मिरवणुकांची आठवण उपस्थितांना झाली. तर नाशिक ढोलाचा उत्तम ठेका झेंबेच्या माध्यमातून तौफिक कुरेशी यांनी सादर करुन रसिकांना त्यावर ताल धरायला लावला.
उत्तरोत्तर रंगलेल्या मैफलीत तौफिकजींनी तोंडाने आवाज काढण्यासोबतच झेंबेतून साकारलेल्या मनोहारी धूनने रसिकांवर मोहिनी घातली. यावेळी रसिकांनीही टाळ्यांच्या माध्यमातून साथ दिली. तर, राग पहाडीमधील उपशास्त्रीय धूनने शिखरनादची सांगता झाली. तौफिक कुरेशी आणि अभिजीत पोहनकर यांनी झेंबे व किबोर्ड या दोन्ही वाद्यांबद्दल रसिकांना माहिती दिली. तसेच नव्या रचना साकारण्यामागील प्रवास देखील उलगडला.

Share
This