Satarvadan_125Year_1

सतार वादन

सतार वादनातून बरसले मंजूळ सूर

पं. निलाद्री कुमार व पं. सत्यजित तळवलकर यांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव

पुणे : पावसाच्या बरसत्या धारांमुळे प्रफुल्लित झालेल्या वातावरणात सतारवर छेडलेल्या तारांमधून निघणा-या मंजूळ सूरांनी पावसाच्या नानाविध रुपांची आठवण रसिक श्रोत्यांना करुन दिली. तबल्यावरची थाप, सतारवर फिरणारी बोटे आणि त्यातून अवतरलेल्या सुमधूर संगीताला दाद देणारे पुणेकर अशा वातावरण स्वरमैफल रंगली. सतार आणि तबल्याच्या जुगलबंदीतून वाद्याचा अनोखा मेळ तालविश्वातील दोन दिग्गज असलेल्या पं. निलाद्री कुमार आणि पं.सत्यजित तळवलकर यांनी सादर केला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सतारवादनाचा सांगितीक कार्यक्रम सादर झाला. यापूर्वी सकाळी दगडूशेठ गणेश मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांतर्गत दुर्लभ होम झाले. तर ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात पं.निलाद्री कुमार यांनी झिंझोटी रागाने केली. त्यानंतर जुन्या गाण्यांमध्ये वापरण्यात आलेल्या सतारीच्या विविध रचना सादर झाल्या. जुन्या चित्रपटात आणि गीतांमधील सतारीचे मंजूळ सूर कानावर पडताच रसिकांना चंदेरी पडद्याच्या त्या काळाची आठवण झाली. शास्त्रीय रचनांशिवाय मैफलीच्या प्रत्येक टप्प्यावर होणा-या सतार आणि तबल्याची जुगलबंदीने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले. उत्तरोत्तर रंगलेल्या या मैफलीची सांगता निलाद्री कुमार यांनी भैरवीने केली.

Share
This