JanataRaja_4

जाणता राजा

शिवरायांच्या रुपाने अवतरले सहयाद्रीचे नवरत्न

जाणता राजा – शिवछत्रपती नाटयप्रयोग सादर; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव

पुणे : महाराष्ट्रावर चालून आलेल्या जुलमी सत्तांनी केलेला अन्याय आणि अत्याचार मोडून काढण्याकरीता सह्याद्रीच्या कुशीतील शिवनेरीवर सूर्यपुत्राचा जन्म झाला. छत्रपती शिवरायांच्या रुपाने जावळीच्या मोरेंपासून ते खुद्ध औरंगजेबाला झुंज देणारा जाणता राजा मराठी जनतेला मिळाला. रोहिडेश्वराची शपथ असो किंवा अफजलखानाचा वध प्रत्येक ठिकाणी आपल्या सख्या-सवंगडींना घेऊन स्वराज्याची धुरा समर्थपणे पेलणारे हे सह्याद्रीचे नवरत्न शिवरायांच्या रुपाने रंगमंचावर अवतरले आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय… चा एकच जल्लोष झाला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जगदंब क्रिएशन्स प्रस्तुत जाणता राजा शिवछत्रपती या महानाटयाचे सादरीकरण झाले. यापूर्वी सकाळी दगडूशेठ गणेश मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांतर्गत दुर्लभ होम झाले.

अवघे अवघे या हो… या गीताने शिवरायांचे स्वागत करण्यासाठी सज्ज असलेल्या भूमीचे वर्णन सुरुवातीला कलाकारांनी केले. शौर्य आणि पराक्रम ही संपत्ती आपल्या जवळ बाळणा-या शिवरायांविषयी वासुदेवाने गुणगान गायले. शहाजी राजांनी शिवरायांच्या हाती शिवमुद्रा व भगवा ध्वज दिला आणि पुढे महाराष्ट्र भूमी सोन्याच्या नांगराने नांगरली गेली. राजमाता जिजाऊ आणि शेकडो मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले आणि सरतेशेवटी आपले शिवाजी महाराज राजे झाले. जन्मसोहळ्यापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा हा प्रवास उपस्थितांनी हाची देही हाची डोळा अनुभविला. कलाकार अमोल कोल्हे यांच्यासह १३० कलाकारांनी यामध्ये सादरीकरण केले.

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांची सर्व माहिती ट्रस्टच्या www.dagdushethganpati.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गणेश मंदिरामधील धार्मिक आणि गणेश कला क्रीडा मंच येथील सांस्कृतिक व संत्सग कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुले असून पुणेकरांनी यामध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Share
This