दिनांक :- ९ मार्च २०१९

dagdusheth ganapati
सार्वजनिक क्षेत्रात निस्पृहपणे काम करणे हीच आप्पांसाठी खरी आदरांजली
महापौर मुक्ता टिळक यांचे प्रतिपादन ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट – थोर गणेशभक्त स्वानंदवासी शंकरराव तथा आप्पासाहेब सूर्यवंशी पथ – नामकरण सोहळा

पुणे : वेगवेगळ्या विचारांच्या माणसांना एकत्र जोडण्याचे काम आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केले. सध्याच्या काळात घरातली माणसे एकत्र रहात नाहीत. परंतु आप्पांनी कार्यकर्त्यांना जोडण्याचे, परिसरातील माणसे घडविण्याचे काम केले. सार्वजनिक कार्य अनेकजण करतात, परंतु पैशाचे वलय निर्माण झाल्यावर निस्पृहपणे काम करणे अवघड असते. पण आप्पांनी सातत्याने निस्पृहपणे काम केले, हे शिकण्यासारखे आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रात निस्पृहपणे काम करणे हीच आप्पांसाठी खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टचे संस्थापक कोषाध्यक्ष थोर गणेशभक्त स्वानंदवासी शंकरराव तथा आप्पासाहेब सूर्यवंशी पथ नामकरण समारंभाचे आयोजन गणपती मंदिराशेजारी करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, माजी आमदार उल्हास पवार, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, अंकुश काकडे, ट्रस्टचे डॉ.बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, नगरसेवक हेमंत रासने, राजेश येनपुरे, अ‍ॅड. गायत्री खडके, विशाल धवनडे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे प्रकाश चव्हाण, राजाभाऊ सूर्यवंशी, मंगेश सूर्यवंशी, राजेश सांकला, शांतीलाल सुरतवाला, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कलगुटकर, दत्ता सागरे, रवींद्र अण्णा माळवदकर, पराग ठाकूर, आनंद सराफ, शिरीष मोहिते, सतिश देसाई, अ‍ॅड.प्रताप परदेशी, राजाभाऊ टिकार, विवेक खटावकर,प्रविण परदेशी, डॉ. मिलिंद भोई आदी मान्यवर उपस्थित होते.
अशोक गोडसे म्हणाले, आप्पा हे शिस्त पाळणारे व्यक्तिमत्व होते. चार हजार वर्गणीपासून सुरु केलेले दगडूशेठ गणपतीचे काम कोट्यावधी रुपयांच्या वर्गणीपर्यंत नेऊन ठेवण्याचे काम आप्पांनी केले. मंडळाचा शताब्दी उत्सव देखील दिमाखात साजरा केला. देव, धर्म, संस्कृती, परंपरा जपण्याबरोबरच समाजातल्या उपेक्षित घटकांसाठी काम केले पाहिजे. मंदिर हे समाजसेवेचे महामंदिर व्हावे, ही त्यांची भूमिका होती. याच भूमिकेतून आम्ही काम करीत आहोत. त्यांनी केलेल्या संस्कारातून आम्हाला खूप शिकायला मिळाले.
उल्हास पवार म्हणाले, एखादी संस्था, बँक, ट्रस्ट कशी चालवावी याची दिशा आप्पांनी दाखविली. शांत स्वभावाचे, प्रसिध्दी परान्मुख असे व्यक्तीमत्व होते. साधे राहून देखील व्यक्तीमत्व प्रगल्भ कसे करावे, हे आप्पांकडून शिकण्यासारखे होते. अंकुश काकडे म्हणाले, आप्पा म्हणजे दिलेल्या शब्दाला जागणारे कार्यकर्ता होते. दगडूशेठ गणपतीचे नाव जगाच्या कानाकोप-यात नेण्यामध्ये आप्पांचा मोठा वाटा आहे, असेही त्यांनी सांगितले.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टचे संस्थापक कोषाध्यक्ष थोर गणेशभक्त स्वानंदवासी शंकरराव तथा आप्पासाहेब सूर्यवंशी पथ नामकरण समारंभाचे आयोजन गणपती मंदिराशेजारी करण्यात आले. नामफलक अनावरण प्रसंगी उपस्थित मान्यवर.