दिनांक :- ९ नोव्हेंबर २०१८

dagdusheth ganapati
सहस्त्रदल कमलाच्या सजावटीमध्ये ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा विराजमान
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे दीपावलीनिमित्त आयोजन ; मंदिरावर कमलपुष्पांच्या पाकळ्यांची आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई

पुणे : कमलपुष्पांच्या पाकळ्यांची सजावट, रंगीबेरंगी दिवे, आकर्षक झुंबरे आणि विविधरंगी फुलांनी सजलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात लाडके गणपती बाप्पा विराजमान झाले. दीपावलीनिमित्त केलेली ही सहस्त्रदल कमलाची सजावट आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासोबतच हे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठविण्याकरीता भाविकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली. दिवाळीनिमित्त मंदिराचा परिसर आकाशकंदिल, पणत्या आणि रांगोळीच्या पायघडयांनी सजविण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीनिमित्त मंदिरावर आकर्षक सजावट करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांसह विश्वस्त आणि कारागिरांच्या संकल्पनेतून ही सजावट साकारण्यात आली.
अशोक गोडसे म्हणाले, अंध:कारवर मात करुन ज्ञानरुपी प्रकाशाकडे नेणारा हा दीपोत्सव आहे. त्यामुळे गणपती बाप्पाच्या कृपेने सगळ्यांच्या जीवनात आनंदरुपी प्रकाश येऊ देत. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवापलीनिमित्त मंदिरावर झुंबरे, आकाशकंदील, पणत्या लावण्यात आल्या. यांसह मंगलआरती, पाद्यपूजन व बँडच्या निनादाने मंदिराचा परिसर देखील दुमदुमून गेला. भाविकांनी ही सजावट पाहण्याकरीता उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.


फोटो ओळ :श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीनिमित्त मंदिरावर आकर्षक सजावट करण्यात आली.