दिनांक :- ९ जून २०१९

dagdusheth ganapati
श्री गणेश सूर्यमंदिरात विराजमान होणार ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा संपन्न

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त गणेशोत्सवात श्री गणेश सूर्यमंदिर साकारण्यात येणार आहे. यंदाच्या मंदिराच्या प्रतिकृतीची साकारण्यात येणारी संकल्पना भारताच्या प्राचीन वेद, पुराणे, शास्त्रे यावर आधारित आहे. उंच शिखरे, मंडप असलेले हे सूर्यमंदिर ओडिशा राज्यातील विश्वप्रसिद्ध प्राचीन आश्चर्य ठरलेल्या कोणार्कच्या सूर्यमंदिरावर आधारित आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ ट्रस्टतर्फे साकारण्यात येणारी ही प्रतिकृती भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे. यावर्षीच्या सजावटीच्या शुभारंभ सोहळा शिल्पकार विवेक खटावकर व वैशाली खटावकर यांच्या हस्ते पार पडला.

सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात झालेल्या कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, दत्तोपंत केदारी, कुमार वांबुरे यांसह सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

अशोक गोडसे म्हणाले, गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरीता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. सूर्याच्या प्रभात, माध्यान्य आणि सायंकालीन अवस्थांचे मनोहारी दर्शन तसेच १२ आदित्य आणि सूर्यास प्रिय असलेल्या कमल, पुंडरिक आणि उत्पालांच्या लता-वेलींच्या डौलदार नक्षींनी व्यापलेले मंदिर भाविकांना यंदा पाहता येणार आहे. अनेक स्तंभ, मालांची तोरणे आणि सिंह, कीर्तिमुख, हंस, यक्ष, सुरसुंदरी आणि आकाशगामी गंधर्वांनी मंदिर सजविले जाणार आहे. सोन्यासारख्या प्रकाशाने व्यापलेले मंदिर गजांत लक्ष्मीने नटलेले असणार आहे. समृद्धीचे प्रतिक असलेले हत्ती, अरुणाच्या सारथ्याने प्रचंड सूर्यरथाचे धावणारे अश्व व रथचक्र हे असणार आहेत.

ते पुढे म्हणाले, मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये अनेक स्तंभी पद्मपीठाच्या सुवर्णी सिंहासनावर श्रीं ची मूर्ती विराजमान होणार आहे. सारसबागेजवळील बाबुराव सणस मैदानासमोरील सजावट विभागात सजावटीचे काम सुरु झाले असून अनेक कारगिर याकरीता दिवसरात्र काम करणार आहेत. शिल्पकार विवेक खटावकर हे मंदिराचे काम करीत आहेत.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त गणेशोत्सवात ओडिशा येथील कोणार्कच्या सूर्यमंदिरावर आधारित श्री गणेश सूर्यमंदिर साकारण्यात येणार आहे. त्यानिमित्त सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात झालेल्या सजावटीच्या शुभारंभाच्या सोहळ्याला उपस्थित मान्यवर.

S001
S006
S004
S003
Dagdusheth 2019
Dagdusheth Ganpati