दिनांक :- ८ एप्रिल २०१९

dagdusheth ganapati
नानाविध गीतांमधून छोट्या सूरवीरांनी गाजविला स्वरमंच
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग मंडळातर्फे मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवात ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : अभंग, भारुड, पोवाडा, गोंधळ अशा वेगवेगळ्या गीतप्रकारांनी बालकलाकारांनी सुरेख सादरीकरणाद्वारे रसिकांना मंत्रमुग्ध केले. हर्षद नायबळ या पाच वर्षाच्या चिमुकल्याने स्वत:चे वर्चस्व सिद्ध करत हास्यविनोद आणि गाणी म्हणत रसिकांंच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले. बच्चे कंपनीने केलेल्या गीतांच्या सादरीकरणाला रसिकांनी मनापासून प्रतिसाद दिला. विविध प्रकारच्या गीतांमधून छोट्या सूरवीरांनी स्वरमंच गाजविला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये छोट्या सूरवीरांचा सूर नवा ध्यास नवा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अभिनेत्री रिंकू राजगुरु, अभिनेता शुभंकर तावडे यांसह कागर चित्रपटाच्या टीमने चित्रपटाविषयी उपस्थितांशी संवाद साधला.
कार्यक्रमाची सुरुवात या रे या सारे या गजाननाला आळवूया… आणि दाता तू गणपती गजानन… या गणपतीच्या गीतांनी झाली. यानंतर फू बाई फू फुगडी फू… या लोकगीताला रसिकांनी दाद दिली. संत तुकाराम यांनी रचलेल्या बोलावा विठ्ठल… सुंदर ते ध्यान उभे विटेवरी… या अभंगांनी रसिक भक्तीरसात न्हाऊन निघाले. आईचा जोगवा मागेन… या गोंधळाच्या सादरीकरणात रसिकांनी देखील ठेका धरला. उघड्या पुन्हा जहाल्या… आणि दर्द के रिश्ते… या गीतांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. प्रतापगडच्या पायथ्याशी खान… या पोवाड्याला रसिकांनी भरभरून दाद दिली.
हर्षद नायबळ, अंशिका चोणकर, स्वराली जाधव, मीरा निलाखे, उत्कर्ष वानखेडे, चैतन्य देवढे, सई जोशी या छोट्या सूरवीरांनी सादरीकरण केले. अमित गोठिवरेकर व ओंकार देवस्कर (की-बोर्ड), किशोर नारखेडे (गिटार), प्रभाकर मोसमकर (ढोलकी,तालवाद्ये), प्रसाद पाध्ये (तबला), आशिष आरोसकर (आॅक्टोपॅड) यांनी साथसंगत केली. मिलिंद कुलकर्णी यांनी निवेदन केले.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. यामध्ये सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमात सादरीकरण करताना छोटे सूरवीर.

S03
S05
S04
S07
S06
S08
S01
S02