दिनांक :- ९ एप्रिल २०२०

dagdusheth ganapati ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे ६०० आदिवासी व ग्रामीण कुटुंबांना एक महिना पुरेल इतके धान्य- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट
खेड-शिवापूर, पौड, सोमाटणे फाटा, खामगाव, खडकवासला व हडपसरच्या आजूबाजूचा परिसर

पुणे : कोरोनामुळे उद््भविलेल्या आणिबाणीच्या परिस्थितीत शेतमालाची विक्री होत नसल्याने तयार शेतमाल पडून आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तर, शेतमजुरी, मासेमारी करून उदरनिर्वाह करणा-यांचे जीवन लॉकडाऊनमुळे ठप्प झाले आहे. अशाच ग्रामीण व आदिवासी भागातील बांधवांना तसेच उपनगरांतील भंगार, काच, पत्रा गोळा करणा-यांसोबतच घरकाम करुन पोट भरणारे व अपंग अशा ६०० कुटुंबांना दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे एक महिना पुरेल इतके धान्य देण्यात आले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व आदिवासी भागासह उपनगरांतील गरजूंना ही मदत देण्यात आली. खेड-शिवापूर, पौड, सोमाटणे फाटा, खामगाव, खडकवासला व हडपसरच्या आजूबाजूच्या परिसरात हे मदत कार्य सुरु आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

खेड-शिवापूर जवळील रहाटवडे गावातील रोजंदारी करणा-या तसेच गरीब, विधवा, निराधार, अपंग महिलांची आणिबाणीच्या परिस्थितीमध्ये बिकट अवस्था आहे. अनेकांच्या शेतमालाची विक्री होत नसून शेतमाल पडून आहे. त्यामुळे हे लोक आर्थिक संकटात सापडले आहेत, अशा १०० महिलांना ट्रस्टने मदत दिली आहे. पंचायत समिती सदस्य पोपट चोरगे, उपसरपंच कृष्णा चोरगे यांसह ट्रस्टचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

पौड तालुक्यातील बेलावडे गावाजवळील वस्ती मध्ये ३०० ते ३५० आदिवासी कातकरी समाजातील लोक राहतात. हे लोक शेती मजुरी, मासेमारी करून उदरनिर्वाह करतात. लॉकडाऊनमुळे त्यांचे जनजीवन ठप्प झाले असून रोजगार नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करायला पैसे नाहीत. त्यामुळे त्यांच्या घरात अन्नधान्य वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला. अशा परिस्थितीत ट्रस्टने स्थानिक व्यापारी संघाच्या मदतीने या आदिवासी कातकरी समाजातील लोकांना मदतीचा हात दिला आहे.

हडपसर येथील वैदुवाडी परिसरातील जुनी म्हाडा कॉलनी येथे ६१ लोकांना ट्रस्टने एक महिना पुरेल एवढे धान्य वाटप केले. यामध्ये भंगार, काच, पत्रा, घरकाम करणारे बांधव तसेच अपंग व भिक्षा मागून उदरनिर्वाह करणा-या लोकांचा समावेश होता. अशा दुर्बल आणि दुर्लक्षित घटकातील लोकांना धान्य स्वरूपात मदत केली आहे. याशिवाय सोमाटणे येथील आदले बुद्रुक येथील ८० आदिवासी कातकरी समाजातील लोकांना, तसेच खडकवासला भागातील खामगाव मावळ येथील ६१ गरजूंना ट्रस्टतर्फे धान्य व वस्तू देण्यात आल्या आहेत.

about dagdusheth ganapatiप्रसिद्धीसाठी PDF येथे डाऊनलोड करा

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व आदिवासी भागासह उपनगरांतील ६०० गरजू कुटुंबांना ही मदत देण्यात आली. खेड-शिवापूर, पौड, सोमाटणे फाटा, खामगाव, खडकवासला व हडपसरच्या आजूबाजूच्या परिसरात हे मदत कार्य सुरु आहे.

Dagdusheth 01
Dagdusheth 02
Dagdusheth 03
Dagdusheth 05