दिनांक :- ८ फेब्रुवारी २०१९

dagdusheth ganapati
गणेशस्तुतीच्या मंगल स्वरांनी दगडूशेठ मंदिरात सजला गणेशजन्म सोहळा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने आयोजन ; मंदिरामध्ये अलोट गर्दी

पुणे : जोजो रे जोजो पार्वतीपुत्रा, लागू दे निद्रा अशा मंगल स्वरांनी पाळणा म्हणत तब्बल महिलांनी गणरायाची मनोभावे प्रार्थना केली. दगडूशेठचे गणपती बाप्पा कृपा आम्हावर करा, तुझा आम्हा आसरा अशा मंत्राच्या नादाने पवित्र झालेल्या वातावरणात दुपारी १२ वाजता शेकडो गणेशभक्तांच्या उपस्थितीत दगडूशेठ गणपती मंदिरात मोठ्या उत्साहात गणेशजन्म सोहळा संपन्न झाला. मंदिरावर केलेली झेंडुच्या विविधरंगी फुलांची, काचेच्या आकर्षक झुंबरांची आरास अशा मनोहारी सजावटीने मंदिर परिसर अधिकच खुलला. शेकडो गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेत सुख-समृध्दी नांदू दे अशी प्रार्थना केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याला शारदा गोडसे, मृणालिनी रासने, ज्योती सूर्यवंशी, यांच्या हस्ते गणेशजन्माचे पूजन झाले. यावेळी संगिता रासने, पूनम चव्हाण, अरुण भालेराव, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, माणिक चव्हाण, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, उल्हास भट, राजाभाऊ घोडके, प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, यतिश रासने, अक्षय गोडसे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वाती पंडित, विद्या अंबरडेकर, मनिषा देशपांडे, पल्लवी मुगडीकर, शुभदा तट्टू, वैशाली गिरमे यांनी बीजमंत्र, गणपतीचा गजर, अथर्वशिर्ष म्हटले. भक्तांनी ७५१ किलोचा मावा व ड्रायफ्रुट मोदक बाप्पाचरणी अर्पण केला. जन्माची आरती पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम् व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते झाली.
शुक्रवारी पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत सुप्रसिद्ध गायिका मधुरा दातार यांनी श्रींच्या चरणी स्वराभिषेक अर्पण केला. शास्त्रीय गायनासह भक्तीगीते ऐकण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळाली. त्यानंतर सकाळी ८ ते ११ यावेळेत गणेश भक्तांच्या हस्ते गणेश याग पार पडला. यामध्ये गणेशभक्तांनी सहकुटुंब सहभाग घेतला.
सायंकाळी ६ वाजता श्रीं ची पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये फुलांनी सजविलेला आकर्षक रथ, बँड आदी सहभागी झाले होते. दगडूशेठ गणपती मंदिरापासून – लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर – रामेश्वर चौक – टिळक पुतळा मंडई – कोतवाल चावडी – बेलबाग चौक- लक्ष्मी रस्ता मार्गे नगरकर तालीम चौक – नू.म.वि. प्रशाला – अप्पा बळवंत चौक – तांबडी जोगेश्वरी मंदिर या मार्गाने गणपती मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला. रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला होता. मंदिराला फुलांसह आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती. गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पुण्यासह देशभरातून आलेल्या गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक सजावट व बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी केलेली अलोट गर्दी.