दिनांक :-६ एप्रिल २०१९

dagdusheth ganapati
दगडूशेठ संगीत महोत्सवास दिमाखात सुरुवात
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग मंडळतर्फे मंदिराच्या ३६ व्या वर्धापदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सवाचे उद्घाटन; प्रकाश छाब्रिया, रितु छाब्रिया, महेश काळे यांची उपस्थिती

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान म्हणजेच दि. ६ ते १३ एप्रिल पर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा संगीत महोत्सव दररोज सायंकाळी ७ ते १० या वेळेत गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. गुढीपाडव्याच्या मंगलदिनी दगडूशेठ संगीत महोत्सवाची दिमाखात सुरुवात झाली आहे.
यावेळी गायक महेश काळे, फिनोलेक्स ग्रुपचे प्रकाश छाब्रिया, मुकुल माधव फाऊंडेशच्या रितु छाब्रिया,गायत्री छाब्रिया, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, माणिक चव्हाण, महेश सूर्यवंशी, कुमार वांबुरे, राजाभाऊ सूर्यवंशी, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सुर्यवंशी, यतीश रासने, सौरभ रायकर, राजाभाऊ घोडके उपस्थित होते.
प्रकाश छाब्रिया म्हणाले, दगडूशेठ मंदिरात दर्शनासाठी जातो कारण आपल्या मनात या गणपतीबद्दल विश्वास आहे. कारण आपण कोणीही देव पाहिला नाही परंतु, ससून हॉस्पिटलच्या कॅन्टिनमध्ये जिकडे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे ट्रस्टी दररोज तीन वेळा तेथील लोकांना मोफत जेवण देतात. यांच्यामध्ये मी देव पाहिला आहे. या ट्रस्टींना मी देव मानतो. महेश काळे म्हणाले, ज्याला आपण सर्वात प्रथम वंदन करतो त्या बाप्पाच्या चरणी सेवा अर्पण करायला मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे.
अशोक गोडसे म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा यावर्षी ३६ वा वर्धापनदिन आहे. ट्रस्टतर्फे दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवात अनेक दिग्गज आपल्या कलेद्वारे गणरायाच्या चरणी सेवा अर्पण करतात.
महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी आप्पा दातार व सहका-यांचे मृदुंगवादन झाले. महोत्सवात सुरेखा पुणेकर यांचा न्यूयॉर्क नटरंगी नार, सूर नवा ध्यास नवा, श्रीधर फडके यांचा फिटे अंधाराचे जाळे, जितेंद्र भुरुक यांचा तुम आ गये हो, आशा खाडीलकर यांचा स्वररंग, पुरुषोत्तम बेर्डे व सहका-यांचा म्युझिकल टेÑंड्स, पं. ह्रदयनाथ मंगेशकर व राधा मंगेशकर यांचा भावसरगम कार्यक्रम होणार आहे. प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी उपस्थित मान्यवर. तसेच मृदुंगवादनाचे सादरीकरण करताना आप्पा दातार व सहकारी.