दिनांक :- ६ एप्रिल २०१९

dagdusheth ganapati
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या चरणी ३ किलो सोन्याचे उपरणे अर्पण
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा ३६ वा वर्धापनपदिन; व्यंकटेश राव यांच्या हस्ते श्रींच्या चरणी सोन्याचे उपरणे अर्पण; परिमंडळ १ चे उपायुक्त सुहास बावचे यांच्या हस्ते गुढीपूजन

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्रींच्या चरणी ३ किलो सोन्याचे उपरणे अर्पण करण्यात आले. पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स पेढीच्यावतीने हे उपरणे बनविण्यात आले आहे. यामध्ये सोन्याप्रमाणेच माणिक, पाचू या रत्नांचा समावेश आहे. तसेच यावर ओम आणि स्वस्तिकाची सुंदर नक्षी देखील आहे. गुढीपाडव्यानिमित्त मंदिराला मोरांची आकर्षक सजावट करण्यात आली. सनई-चौघडा, बँडच्या मंगलमयी नादात मंत्रोच्चाराने पवित्र झालेल्या वातावरणात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
यावेळी उपरण्याची विधीवत पूजा करून व्यंकटेश्वरा हॅचरिज ग्रुपचे व्यंकटेश राव यांच्या हस्ते उपरणे श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आले. परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या हस्ते गणरायाची आरती करुन गुढीपूजन करण्यात आले. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस माणिक चव्हाण, दत्तोपंत केदारी, राजाभाऊ घोडके, महादेव पवार, विनायक रासने, गजानन गोडसे उपस्थित होते. रांगोळ्यांच्या पायघड्या घालून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. प्रभात बँड व दरबार बँडमधील कलाकारांनी गणरायाचरणी सेवा अर्पण केली. यावेळी गणेश यागही आयोजित करण्यात आला होता.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, गुढीपाडव्यानिमित्त येणार वर्ष सुखाचे, समृध्दीचे, समाधानाचे जावो अशी प्रार्थना गणराया चरणी करुया. सर्वांना भयमुक्त जीवन जगता यावे, लोकशाही मजबूत व्हावी, लोकांच्या मनात जे आहे ते स्वीकारण्याचे काम व्हावे.
सुहास बावचे म्हणाले, हे वर्ष सर्व पुणेकरांना सुखाचे, समृध्दीचे, भरभराटीचे जाओ अशा गुढीपाडवा आणि नवीन वर्षानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो. आम्ही जे काम करतो या कामात आम्हाला सद्बुध्दी द्यावी. पुणेकरांसाठी लोकांसाठी चांगले काम करण्यासाठी देवाने आम्हाला शक्ती द्यावी, अशी गणराया चरणी प्रार्थना. अशोक गोडसे म्हणाले, आजच्या शुभदिनी ३ किलो रत्नजडीत उपरणे देवाला अर्पण करण्यात आले. राव कुटूंबीय अनेक वर्षापासून गणरायाची सेवा करतात. त्यांनी या आधी गणपती बाप्पाला अनेक प्रकारचे अलंकार त्यांनी अर्पण केले आहेत. या आधी गणरायाला सोन्याचे सोवळे अर्पण केले होते. आता उपरणे अर्पण केले आहे. त्यामुळे भारतीय परंपरेप्रमाणे पोशाखाला परिपूर्णता आली आहे.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्याला श्रींच्या चरणी ३ किलो सोन्याचे उपरणे अर्पण करण्यात आले. तसेच यावेळी मंदिरात गुढीपूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर. मंदिरावर करण्यात आलेली आरास.

D 6
D 1
D 4
D 9
D 11
D 10
D 7
D 8