दिनांक :-७ एप्रिल २०१९

dagdusheth ganapati
ढोलकीचा ठेका आणि लावणी सम्राज्ञींच्या अदाकारीने जिंकली रसिकांची मने
सुरेखा पुणेकर व सहकलाकारांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग मंडळातर्फे मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन

पुणे : ढोलकीच्या ठेका धरायला लावणा-या नादात अप्रतीम पदन्यासाची आणि हावभावाची जोड देत लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी आपल्या नृत्याने रसिकांवर नृत्याची भुरळ घातली. गण, गवळण, मुजरा, बैठकीची लावणी अशा विविध प्रकारांमधून रसिकांनी लावणी या लोकप्रिय कलेचा अविष्कार अनुभवला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा न्यूयॉर्क नटरंगी नार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात गणराया ताराया यावे धावूनी… या गणाने झाली. आला आला गोविंदा आला… या गवळणीने रसिकांची मने जिंकली. या रावजी बसा भाऊजी… आणि पिकल्या पानाचा… या बैठकीच्या लावणीच्या सादरीकरणाने सुरेखा पुणेकर यांनी रसिकांची वाहवा मिळविली. मी मेनका उर्वशी… आणि सोडा राया सोडा हा नाद खुळा… या लावणीच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. आज वाजवा की… पाडाला पिकलाय आंबा… पारवाळ घुमतय कस… छत्तीस नखरेवाली… कुणीतरी न्या हो मला फिरवायला… अशा एकाहून एक सरस लावण्यांनी कार्यक्रमाला उत्तरोत्तर रंग चढला. प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. ‘न्यूयॉर्क नटरंगी नार’ या कार्यक्रमामध्ये सादरीकरण करताना लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर व सहकलाकार.

S04
S09
S11
S13
S12
S08
S06
S05
S02
S01