दिनांक :- ७ मे २०१९

dagdusheth ganapati
अक्षयतृतीयेनिमित्त ‘दगडूशेठ’ ला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन; ससून रुग्णालयातील रुग्णांना आणि गणेशभक्तांना होणार आंब्याच्या प्रसादाचे वाटप

पुणे : मंगलमूर्तींच्या भोवती केलेली आंब्यांच्या आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती… प्रवेशद्वारापासून गाभा-यापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी केलेली सजावट आणि स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते.
यापूर्वी पहाटे ४ वाजता प्रख्यात गायक अजित कडकडे यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. भक्तीगीतांसोबतच गणेशस्तुतीपर गीते देखील यावेळी सादर करण्यात आली. सकाळी ८ वाजता देसाई बंधू आंबेवालेचे मंदार देसाई आणि कुटुंबियांच्या हस्ते गणेशयाग झाला. तर, अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाच्या वतीने उटीचे भजन देखील आयोजित करण्यात आले होते. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम तसेच गणेशभक्तांना बुधवारी देण्यात येणार आहे, असे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे अक्षयतृतीयेनिमित्त मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला.

A009
A005
A006
A012
A004
A001