दिनांक :- ५ जून २०१९

dagdusheth ganapati
शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ ला ११ हजार फळांचा नैवेद्य
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन; गणरायाच्या पाताळातील गणेश जयंतीनिमित्त मंदिराला आकर्षक सजावट

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गुरुवार, दिनांक ६ जून रोजी सकाळी ८ वाजता मंदिरात ११ हजार फळांचा नैवेदय दाखविण्यात येणार आहे. या दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. गाणपत्य संप्रदायात भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी प्रमाणेच ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीच्या गणेश जन्माचे ही अत्यंत महत्त्व आहे. शेषात्मज अवतार भगवान शेषांच्या घरी झालेला म्हणून हा पाताळातील अवतार आहे. त्यामुळे मंदिरावर याविषयाशी निगडीत आकर्षक आरास करण्यात येणार आहे.

मंदिरात गुरुवारी पहाटे ४ वाजता गायक राजू बर्वे यांचा स्वराभिषेक हा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सकाळी ८ वाजता महागणेश व सत्यविनायक पूजा होणार आहे. दुपारी ४ वाजता गणेश कथाकार ह.भ.प. रुक्मिणी आई तारु महाराज यांचे कीर्तन होणार आहे. तर, सायंकाळी ६ वाजता सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांच्या हस्ते विशेष महाआरती होणार आहे.

भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झाले. त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले. त्याच्याकडे पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले. परिणामी आपल्या नव्या अपत्याला त्यांनी मायाकर असे नाव दिले. अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केले. पुढे विप्रचित्ती नामक राक्षसाने या मायाकराला राक्षसांचा राजा केले. मायाकराने आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरवशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्ग लोक जिंकले. त्यानंतर त्याने पाताळावर आक्रमण केले. त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचे स्मरण केले.

श्रीशेष ध्यान करत असतांना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश श्रीशेषात्मज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला मध्यान्य समयी प्रकट झाले. याच अवतारात पुढे गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर ,देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तिने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले. या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुर वध केल्यामुळे याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषकग असे पण नाव प्राप्त झाले. गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे. तरी भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Dagdusheth Ganpati
Dagdusheth Ganpati, Pune