दिनांक :- ५ जुलै २०१८

dagdusheth ganapati
माऊलींच्या अश्वांची दगडूशेठ गणपतीला आगळीवेगळी मानवंदना सलग दुस-या वर्षी गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; पुणेकरांतर्फे अश्वांचे पूजन

पुणे : माऊली माऊली आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली. पालखी सोहळ्याच्या इतिहासात मागील वर्षी प्रथमच माऊलींच्या मानाच्या अश्वांनी गणेश मंदिराच्या सभागृहात प्रवेश केला होता. त्यामुळे यंदा सलग दुस-या वर्षी प्रत्यक्ष मंदिराच्या सभामंडपात अश्वांनी प्रवेश करुन गणरायाला वंदन केले. यावेळी पुणेकरांतर्फे अश्वांचे पूजन करीत विश्वकल्याणासाठी श्रीगणेश आणि माऊली चरणी प्रार्थना करण्यात आली.

कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सुर्यवंशी, उर्जीतसिंह शितोळे (सरकार), महादजी राजे शितोळे (सरकार), अंकलीकर (बेळगाव), राजाभाऊ थोरात, मारुती कोकाटे, बाळासाहेब वांजळे, अरुण देशमाने यांसह वारकरी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होती.
शितोळे सरकार म्हणाले, माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. दोन वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिरा बाहेरुन गणरायाचे दर्शन होत असे. परंतु सलग दुस-या वर्षी अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना दिली असून ही शुभ गोष्ट आहे. गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदीकडे प्रस्थान करतील. आषाढी वारी ही शेतक-यांची वारी आहे. त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात.
महेश सुर्यवंशी म्हणाले, वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. मागील वर्षीप्रमाणे सलग दुस-या वर्षी हे अश्व दगडूशेठ गणपती मंदिराच्या सभामंडपात आले. ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त वारीसोहळ्यातील राबविण्यात येणा-या उपक्रमांची सुरुवात चांगली झाली असून हरित वारी, स्वच्छता आणि वारक-यांकरीता अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकारच्या मालकीच्या दोन मानाच्या अश्वांचे आगमन झाले. गणेश मंदिराच्या सभामंडपात मानाच्या अश्वांनी सलग दुस-या वर्षी गणरायाला आगळीवेगळी मानवंदना दिली.