दिनांक :- ४ एप्रिल २०१८

‘दगडूशेठ’ चा वासंतिक उटी, मोगरा महोत्सव बुधवारी (दि.४)
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ;
अंगारकी चतुर्थीला प्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन हिची स्वराभिषेकातून गायनसेवा

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे बुधवार, दिनांक ४ एप्रिल रोजी मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गणरायाच्या मूर्तीला व मंदिरावर मोग-याच्या लाखो फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. मोग-याची आरास बुधवारी सायंकाळी ६ नंतर गणेशभक्तांना पाहण्याकरीता खुली राहणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

गणेश मंदिराचा संपूर्ण गाभारा, मंदिर परिसर व मंदिराच्या कळसावर मोग-यासह विविध रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात येणार आहे. याशिवाय गणेशाच्या मूर्तीला फुलांचा मुकुट, वस्त्र, आभूषणे ही देखील मोगरा व इतर फुलांनी साकारण्यात येणार आहेत. मोगरा महोत्सवानंतर रात्री ९ वाजता अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाचे उटीचे भजन देखील होणार आहे.

अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवार, दिनांक ३ एप्रिल रोजी पहाटे ४ ते ६ यावेळेत प्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन ही स्वराभिषेक या कार्यक्रमाद्वारे गायनसेवा अर्पण करणार आहे. त्यानंतर सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत गणेशयाग आयोजित करण्यात आला आहे. अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिर पहाटे ३ वाजल्यापासून भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

तरी वरील बातमीस आपल्या सुप्रसिद्ध दैनिक/ वृत्तवाहिनीवर प्रसिद्धी द्यावी. तसेच कार्यक्रमाला आपला बातमीदार व छायाचित्रकार पाठवावा, ही नम्र विनंती.

*फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भावसरगम कार्यक्रमात सादरीकरण करताना पं. ह्रदयनाथ मंगेशकर, राधा मंगेशकर आणि मधुरा दातार.