दिनांक :- ३ सप्टेंबर २०१९

dagdusheth ganapati ऋषीपंचमीनिमित्त विद्यार्थिनींनी केले ऋषीतुल्य दिव्यांग सैनिकांचे पूजन-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेच्या गणेशोत्सवातील उपक्रमांतर्गत ऋषीपंचमीनिमित्त सैनिक पुनर्वसन केंद्रातील सैनिकांचे पूजन

पुणे : शस्त्र हातात घेऊन निधड्या छातीने देशाच्या सिमेवर शत्रूंच्या गोळ्यांचा सामना करण्यासाठी सैनिक सदैव सज्ज असतात. मातृभूमीचे रक्षण करताना काही सैनिकांना अपंगत्व येते. आपल्या जीवाची पर्वा न करता मातृभूमीचे प्राणपणाने रक्षण करताना अपंगत्व आले असले तरीदेखील मातृभूमीकरिता काहीही करण्याची तयारी असणारे हे सैनिक. अशा खडकी येथील अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रांतील सैनिकांप्रती आदर व्यक्त करीत विद्यार्थिनींनी ऋषीपंचमीनिमित्त ऋषीतुल्य दिव्यांग सैनिकांचे पूजन केले. बँडच्या तालावर एन. सी. सी. च्या विद्यार्थिनिंनी सॅल्युट करीत सैनिकांचे स्वागत केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतर्फे आयोजित गणेशोत्सवातील उपक्रमांतर्गत ऋषीपंचमीनिमित्त रेणुका स्वरुप प्रशालेत ऋषीतुल्य सैनिकांच्या पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कार्याध्यक्ष महेश सूर्यवंशी, जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेचे डॉ. अ. ल. देशमुख, मोहित चांदोरकर, माजी मुख्याध्यापिका विजयमाला घुमे, उपमुख्याध्यापिका सविता हिले, पर्यवेक्षक संजय जाधव, शिक्षिका रत्नमाला माळी, रत्नमाला कांबळे, यशदा देशपांडे, सुमेधा चिथडे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अधिकारी सचिन अंबर्डेकर, मनोज साळी उपस्थित होते.

यामध्ये खडकी येथील अपंग सैनिक पुर्नवसन केंद्रांतील एअरफोर्समधील एल. ए. सी. लिडींग एअरक्राफ्ट्समन मृदुल घोष, आर्मीमधील एस. इ. पी. शिपाई संदिप उकिरडे, नेव्हीमधील ई. एम. ए. इलेक्ट्रिक मेकॅनिकल आर्टिस्ट सुदाम बिशोई या सैनिकांचे पूजन करून सन्मान करण्यात आला.

विद्यार्थीनींशी संवाद साधताना मृदुल घोष म्हणाले, तुम्ही आज आमचे पूजन व सन्मान केला त्यामुळे खूप छान वाटले, एक चांगले वातावरण इथे निर्माण झाले. देशाचे रक्षण करणे हेच सैनिकाचे पहिले कर्तव्य असते. तुम्ही विद्यार्थिनी देखील सैन्यदलात सामील होऊ शकता. महिला कोठेही कमी नाहीत त्या काहीही करू शकतात.

संदिप उकिरडे म्हणाले, आर्मीमध्ये भरती होण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे. देशाचे रक्षण करताना ऊन, वारा, पाऊस कोणतीही परिस्थिती असली तरी टास्क पूर्ण करायचा हेच ध्येय्य असते. आर्मीमुळे खरे आयुष्य जगणे काय आहे हे समजले. असा आपला प्रेरणादायी प्रवास सैनिकांनी विद्यार्थिनिंसमोर उलगडला. सुदाम बिशोई यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.

डॉ. अ. ल. देशमुख म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून शाळांमध्ये देखील गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, यासाठी जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विविध शाळांमध्ये गणेशोत्सव काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या उपक्रमाची सुरुवात रेणुका स्वरुप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूल येथे करण्यात आली. यानंतर विविध शाळांमध्ये अथर्वशीर्ष पठण, व्यसनमुक्ती विषयी जनजागृतीपर उपक्रम, अथर्वशीर्षाचा अर्थ समजून देण्यासाठी व्याख्यान व इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये रेणुका स्वरुप प्रशालेसह, नवीन मराठी प्रशाला, विमलाबाई गरवारे प्रशाला, नू. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, श्री शिवाजी मराठा जिजामाता मुलींचे हायस्कूल या शाळांचा सहभाग असणार आहे.

about dagdusheth ganapatiप्रसिद्धीसाठी PDF येथे डाऊनलोड करा

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतर्फे आयोजित गणेशोत्सवातील उपक्रमांतर्गत ऋषीपंचमीनिमित्त रेणुका स्वरुप प्रशालेत ऋषीतुल्य दिव्यांग सैनिकांच्या पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खडकी येथील अपंग सैनिक पुर्नवसन केंद्रांतील सैनिकांचे बँडच्या तालावर स्वागत व औक्षण करून पूजन करताना विद्यार्थिनी.

d2
d1
d7
d6
d4
d3