दिनांक :- ३ मार्च २०१९

dagdusheth ganapati
जय गणेश पालकत्त्व योजनेतील विद्यार्थ्यांनी सादर केल्या विज्ञानातील गमतीजमती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; ज्येष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. विद्याधर बोरकर यांची प्रदर्शनाला उपस्थिती

पुणे : आधुनिक शेती, फायर अर्लाम, शरीराचे अंतरंग, हायड्रोलिक लिफ्ट, फुलपाखरांचे जीवनचक्र,सौर उर्जा अशा एकाहून एक सरस प्रकल्पांमधून जय गणेश विद्यार्थी पालकत्त्व योजनेतील चिमुकल्यांनी विज्ञानातील गमतीजमती सादर केल्या. ज्वालामुखी, पाण्याची घनता, पवनचक्की, धरणातून होणारी वीजनिर्मीती असे नानाविध प्रकल्प सादर करीत आपल्या आजूबाजूला घडणा-या वैज्ञानिक गोष्टींविषयीची माहितीही विद्यार्थ्यांनी उपस्थितांना दिली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे नवीन मराठी शाळेत ट्रस्टच्या जय गणेश पालकत्त्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ.विद्याधर बोरकर, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, अरुण भालेराव, राजाभाऊ घोडके, बाळासाहेब सातपुते, ज्ञानेश्वर रासने, विश्वास पलुसकर यांसह पदाधिकारी व संस्कार वर्ग प्रशिक्षक उपस्थित होते. प्रदर्शनात ८० हून अधिक प्रकल्प मांडण्यात आले होते.
डॉ.विद्याधर बोरकर म्हणाले, विज्ञानातील प्रकल्पांविषयीची माहिती व तत्वे विद्यार्थी आनंदाने सांगतात, ही कौतुकास्पद बाब आहे. विज्ञानाचा प्रसार होणे ही समाजाची गरज आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन विद्यार्थ्यांमध्ये जागृत करायचा असेल, तर अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
अशोक गोडसे म्हणाले, ज्ञानवर्धन अभियानांतर्गत ट्रस्टने अनेक विद्यार्थ्यांचे पालकत्त्व घेतले. त्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे प्रयोग सादर आहेत. विज्ञानाची कास धरुन त्याचे प्रत्यक्ष दैनंदिन जीवनातील महत्त्व समजावे, याकरीता असे प्रकल्प व प्रदर्शने उपयुक्त आहेत. प्रत्येक घटनेमागे शास्त्रीय विवेचन असते. त्यामुळे विज्ञान प्रकल्पांमधून आपल्याला नैसर्गिक गुणधर्मांच्या क्रिया व प्रतिक्रिया समजतात.
अरुण भालेराव म्हणाले, मानवी वस्तीमुळे बिघडलेल्या पर्यावरणाची जाणीव आजच्या पिढीला होणे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे जय गणेश पालकत्त्व योजनेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात देखील पर्यावरणपूरक साधने वापरली आहेत. विज्ञानातील गमतीजमती अशाच प्रकारे आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे नवीन मराठी शाळेत ट्रस्टच्या जय गणेश पालकत्त्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदर्शन पाहताना मान्यवर व पुणेकर.