दिनांक :- ३ जुलै २०१८

dagdusheth ganapati
आषाढी वारीतील ३०० वीणेक-यांना ‘दगडूशेठ’ तर्फे मानाचे फेटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे सन्मान ; संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व जगद््गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळयातील वीणेक-यांनी केली आरती

पुणे : आषाढी वारीमध्ये कित्येक मैल पायी चालणा-या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील ३०० वीणेक-यांना मानाचे फेटे देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात विविध दिंडयांमधील वीणेक-यांनी सन्मान स्विकारत मानाचे फेटे परिधान करुन श्रीगणेशाची आरती केली.

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्ञानेश्वर माऊलींचे वंशपरंपरागत चोपदार रामभाऊ चोपदार, ह.भ.प.राजाभाऊ थोरात, बाळासाहेब वांजळे, दिंडी संघटनेचे अध्यक्ष मारुती कोकाटे, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, माणिक चव्हाण आदी उपस्थित होते.
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील खंडोजीबाबा देवस्थान दिंडी क्र. २, शेडगे दिंडी क्र. ३, गो-हेकर संस्थान दिंडी क्र. ११, भोई समाज दिंडी क्र. २७, निकम दिंडी क्र. १६, नांदेडकर दिंडी क्र. १५, खडकतकर दिंडी क्र. १, मुक्ताबाई बेलगावकर दिंडी क्र. ५९ यांसह तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील नवी पेठ विठ्ठल मंदिर दिंडी क्र. ४ आदी दिंडीतील वीणेक-यांचा प्रातिनिधीक स्वरुपात मानाचे फेटे देऊन सन्मान करण्यात आला.
रामभाऊ चोपदार म्हणाले, वारकरी संप्रदायाला विविध स्तरांतून मदत उपलब्ध होते. मात्र, दगडूशेठ ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने मदत दिली जात आहे. स्वच्छता अभियान, हरित वारी यांसारख्या ट्रस्टतर्फे राबविण्यात येणा-या उपक्रमांमुळे केवळ वारीपुरतेच नाही, तर वर्षभर ग्रामीण भागातील नागरिकांना नकळतपणे मदत मिळत आहे.
अशोक गोडसे म्हणाले, ट्रस्टच्या माध्यमातून आषाढी वारीकरीता रुग्णवाहिका, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि भोजनासारखे अनेक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. यंदा वारीतील वीणेक-यांना मानाचे फेटे देऊन सन्मान करण्याची संधी ट्रस्टला मिळाली. यापुढेही वारक-यांकरीता अनेक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आषाढी वारीत कित्येक मैल पायी चालणा-या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील ३०० वीणेक-यांना मानाचे फेटे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी वीणेक-यांच्या हस्ते गणेशाची आरती देखील करण्यात आली.