दिनांक :- ३ ऑगस्ट २०१८

dagdusheth ganapati
भावार्थ असेल तर भक्ती आणि प्रेमाची दिपीका पेटेल ह.भ.प. बाबामहाराज सातारकर : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे चार्तुमासानिमित्त प्रवचन

पुणे : कर्म केल्याने होते, पण भाव श्रद्धेच्या माध्यमातूनच प्रकट होतो. भगवंताविषयी आपल्या मनात भाव प्रकटणे आवश्यक आहे. ज्ञानेश्वरीमधील भाव लक्षात आल्यानंतर जो अर्थ प्रगट होतो, तो अलौकिक आहे. भाव असेल तरच भक्ती आणि प्रेमाची दीपिका पेटेल. ज्ञानेश्वरीचा भाव कळला तर अर्थ कळेल, असे मत ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे चातुर्मासानिमित्त ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रवचन गणेश कला क्रीडा मंच येथे गुरूवार, दिनांक ३० आॅगस्ट पर्यंत दररोज सायंकाळी ७ ते ८ यावेळेत सुरू आहे. यावेळी बाबामहाराजांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठावर निरुपण करीत भक्ती आणि परमार्थाचा अर्थ सांगितला.
बाबामहाराज सातारकर म्हणाले, अभ्यास केल्याने भाव प्रकट होत नाही, तर ज्ञानामध्ये वाढ होते. मनामध्ये जर भावार्थ प्रकट व्हायचा असेल, तर मनात श्रध्दा असणे गरजेचे आहे. तसेच ज्ञानोबारायांचा हरिपाठाचा अर्थ कळला तरच त्यातील भावार्थ कळेल. अन्यथा हरिपाठ तर सर्वांनाच पाठ असतो, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचली की भगवंताकडे काही मागण्याची इच्छा उरत नाही. जोपर्यंत चंद्र आहे, तोपर्यंत ज्ञानेश्वरी ग्रंथाची कीर्ती अखंड आहे. संपूर्ण अमृतानुभवात जीवाची व्याख्या नाही, तर जगाची व्याख्या आहे. कारण जग असेल तर जीव आहेच, ही दूरदृष्टी ठेऊन ज्ञानोबारायांनी तत्त्वज्ञान मांडले आहे. ज्या काळात ज्ञान चोरून ठेवले जात होते, त्याकाळात ज्ञानेश्वरांनी ज्ञान देण्याची वृत्ती निर्माण केली, तोच परमार्थ आहे.

फोटो ओळ : ह.भ.प. बाबामहाराज सातारकर : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे चार्तुमासानिमित्त प्रवचन