दिनांक :- ३१ ऑगस्ट २०१९

dagdusheth ganapati ‘दगडूशेठ’ च्या श्री गणेश सूर्यमंदिर सजावटीचा उद््घाटन सोहळा-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट; शिर्डी कोकमठाण येथील प.पू.विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सजावटीचे उद््घाटन

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त श्री गणेश सूर्यमंदिर साकारण्यात आले आहे. गणेश चतुर्थीला सोमवार, दिनांक २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी शिर्डी कोकमठाण येथील प.पू.विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद््घाटन सायंकाळी ७ वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

सोमवारी (दि.२) प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून शेषात्मज रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. फुलांनी साकारलेले २१ नाग रथावर लावण्यात येणार आहेत. मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक येणार आहे. देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे. दुपारी १२.२० पर्यंत प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम होणार असून भाविकांनी दुपारी १२.३० नंतर श्रीं च्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. यंदाची सजावट असलेले श्री गणेश सूर्यमंदिर ओडिशा राज्यातील विश्वप्रसिद्ध प्राचीन आश्चर्य ठरलेल्या कोणार्कच्या सूर्यमंदिरावर आधारित आहे.

Dagdusheth Ganpati Sept 2019