दिनांक :- ३० जुलै २०१९

dagdusheth ganapati हरिपाठामध्ये अध्यात्म व परमार्थातील सार –
ह.भ.प.बाबामहाराज सातारकर; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे चातुर्मासानिमित्त हरिपाठावरील प्रवचनाचे आयोजन; पुणेकरांना विनामूल्य प्रवेश

पुणे : सहज, सुलभ परमार्थ व सुलभ भाषेमध्ये जे सांगितले गेले, त्याला हरिपाठ म्हणतात. अध्यात्म, परमार्थातील सर्व विषय मांडले, पण त्या सर्वांचे सार हरिपाठ म्हणून सांगितले आहे. ज्या ज्ञानाला अनुभवाची जोड आहे, त्याला बोध म्हणतात. प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञान आहे, मात्र एखाद्या गोष्टीबद्दल केवळ माहिती असणे महत्वाचे नाही, तर ती गोष्ट किंवा वस्तू योग्य रितीने वापरता येणे आवश्यक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती अनुभवातून बोलते, तेव्हा त्याच्यामधील आत्मविश्वास दिसून येतो, असे मत प्रवचनकार ह.भ.प बाबा महाराज सातारकर यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे चातुर्मास सोहळ्यानिमित्त सातारकर यांच्या प्रवचनाचे आयोजन स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठावर ते निरुपण करीत आहेत.

ह.भ.प बाबा महाराज म्हणाले, आज देहप्रतितीवर मनुष्य थांबला आहे. जगत्, जीव आणि परमात्मा या तीन शब्दांना ईश्वरी सत्तेत महत्व आहे. समाजातील आणि परिसरातील स्वच्छतेप्रमाणे देह, ज्ञानाच्या स्वच्छतेची जाणीव आपल्याला व्हायला हवी. तसेच प्रत्येकामध्ये क्षात्र गुण असायला हवा. मेणाहून मऊ असे आम्ही आहोत, पण अंगावर आलात तर व्रजाहून अधिक कठिण घाव घालू, असे संतांनी सांगून ठेवले आहे.

पुढे ते म्हणाले, अज्ञानाकडून ज्ञान आले. पण अज्ञानाच नसेल, तर ज्ञान तरी कुठून राहणार. त्यामुळे ज्ञानातच ज्ञानाचा अनुभव येतो, असे म्हणतात. चांगले बोललेले लक्षात रहात नाही. पण वाईट बोललेले कायम लक्षात रहाते. काही काही गोष्टी आपण कधीतरी करतो, पण त्याची आठवण होतेच. अनुभव जरी विरुन गेला, तरी योग्य वेळी आठवतो, हे हरिपाठात सांगितले आहे.

शून्य दाखवायचा म्हटला, तर बिंदू चा उपयोग करावा लागतो. तसे अद्वैत सांगायचे असेल, तर द्वैतात आल्याशिवाय सांगता येत नाही. एखाद्या वेळी माणूस म्हणतो आम्ही काही बोललेलो नाही. तेव्हा काहीतरी बोलले हे लक्षात ठेवावे.

हे प्रवचन दिनांक १९ आॅगस्ट पर्यंत दररोज सायंकाळी ७ ते ८ या वेळेत होणार आहे. महिनाभर सुरु राहणा-या या प्रवचनाला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे चातुर्मास सोहळ्यानिमित्त ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांच्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठावर प्रवचनाचे आयोजन स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. यावेळी बोलताना ह.भ.प.बाबा महाराज सातारकर.

B09
B05