दिनांक :- २ जुलै २०१९

dagdusheth ganapati ‘दगडूशेठ’ च्या जय गणेश हरित वारी अंतर्गत वृक्षारोपण
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गावर वाल्हे मुक्कामी कार्यक्रम; हजारो वारक-यांना महाप्रसाद आणि रुग्णवाहिकांच्या माध्यमातून आरोग्यसेवा

पुणे : निर्मल वारी, हरित वारी हा विचार समोर ठेऊन महाराष्ट्रातील पालखी मार्ग व महामार्गावर ५० लाख वृक्ष लावून स्थानिकांच्या मदतीने त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प दगडूशेठ ट्रस्टने केला होता. त्याअंतर्गत विविध ठिकाणी वृक्षारोपण सुरु असून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गावर वाल्हे मुक्कामी ट्रस्टच्या पदाधिका-यांनी व कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण केले. याशिवाय हजारो वारक-यांना महाप्रसाद आणि रुग्णवाहिक व आरोग्य तपासणीच्या माध्यमातून सेवा दिली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे वाल्हे पालखी तळावर आयोजित कार्यक्रमात जय गणेश हरित वारी अंतर्गत हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. दगडूशेठ ट्रस्टचे उत्सवप्रमुख नगरसेवक हेमंत रासने, माणिक चव्हाण, राजाभाऊ चव्हाण, दिनेश परदेशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, सचिन आखाडे, यतिश रासने, सोमनाथ वाईकर, विनायक रासने, अभिजीत कोद्रे, विशाल केदारी आदी यावेळी उपस्थित होते.

हेमंत रासने म्हणाले, पंढरीच्या वारीसारख्या धार्मिक उत्सवाला जय गणेश हरित वारीतून सामाजिक कार्याची जोड मिळाल्याने पर्यावरण रक्षणाचा संदेश देशभर जाणार आहे. यामध्ये वृक्षलागवडीप्रमाणेच संवर्धनाकरीता पालखी मार्गावरील गावे आणि ग्रामस्थांचा मोठा सहभाग असणे गरजेचे आहे. पर्यावरण रक्षणाकरीता संपूर्ण महाराष्ट्रात ५० लाख वृक्ष लावण्याचा संकल्प करुन जय गणेश हरित वारीची सुरुवात झाली होती. झाडांचे संगोपन ही आपली जबाबदारी असून पालखी मार्गावरील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांच्यावर संगोपनाची जबाबदारी देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

प्रकाश चव्हाण म्हणाले, जय गणेश हरित वारी या उपक्रमामध्ये आळंदी व देहू देवस्थान, वनराई, देवराई तळेगाव, रानजाई, भारतीय वारकरी मंडळ, श्री म्हसोबा देवस्थान ट्रस्ट, आपलं पर्यावरण नाशिक, कमिन्स इंडिया, बायोस्फिअर्स, पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन, कोटेश्वरी फाऊंडेशन, ग्रामपंचायत श्री क्षेत्र देहू, निसर्गमित्र, निसर्ग सायकल मित्र, वृक्षवल्ली, शिवदुर्ग संवर्धन, निसर्ग सेवक, ढोले नर्सरी, वृक्षसंवर्धन समिती देहू आदी संस्था व संघटना सहभाग घेत आहेत. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी यांसह विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे वाल्हे पालखी तळावर आयोजित कार्यक्रमात जय गणेश हरित वारी अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. यावेळी वृक्षारोपण करताना दगडूशेठ गणपती ट्रस्टचे पदाधिकारी. तसेच महाप्रसाद वाटप व आरोग्यसेवा देताना कार्यकर्ते.

V001
V002
V006
V008
V007
V009