दिनांक :-२ एप्रिल २०१९

dagdusheth ganapati
ससूनमधील ‘दगडूशेठ’ तर्फे सुरु असलेल्या किचनमध्ये रोटी मेकर मशिनचे लोकार्पण
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत उपक्रम – इंदिरा ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटतर्फे २५ व्या वर्धापनदिनानिमित्त रोटी मेकर मशिन ची भेट

पुणे : समाजसेवेचे मंदिर उभारण्याकडे वाटचाल करणा-या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे गेल्या अनेक वर्षापासून ससून रुग्णालयात सुरु असलेल्या जय गणेश रुग्णसेवा अभियानंतर्गत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना भोजन व्यवस्था देण्यात येते. या उपक्रमांतर्गत सुरु असलेल्या किचनमध्ये रोटी मेकर चे अत्याधुनिक मशिन इंदिरा ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटतर्फे संस्थेच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त भेट म्हणून देण्यात आले. रोटी मेकर मशिनमधून एका तासाला एक हजार पोळया तयार होणार असून याद्वारे रुग्णांना त्वरीत आणि उत्तम भोजन उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ससून रुग्णालयातील किचन विभागात हा उपक्रम सुरु आहे. रोटी मेकर मशिनच्या लोकार्पण सोहळ्याला इंदिरा ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या चेअरपर्सन डॉ.तरिता शंकर, प्रा.चेतन वाकलकर, ससूनचे अधिष्ठाता डॉ.सुधीर नणंदकर, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, उल्हास भट, माऊली रासने, बाळासाहेब सातपुते, प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, सौरभ रायकर, विलास रायकर, चेतन लोढा, विनायक रासने, तानाजी शेजवळ यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
तरिता शंकर म्हणाल्या, दगडूशेठ गणपती ट्रस्टप्रमाणे आमचाही खारीचा वाटा म्हणून इंदिरा ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटतर्फे गेली अनेक वर्षे सामाजिक काम सुरु आहे. अन्नदाता हा समाजातील महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळेच ससून रुग्णालयात येणा-यांना चांगले जेवण मिळावे, याकरीता हा प्रयत्न करण्यात येत आहे.
डॉ.सुधीर नणंदकर म्हणाले, ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांना भोजन देण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरु आहे. मात्र, अशा उपक्रमांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. या रोटी मेकरमुळे अधिकाधिक वेगाने पोळ्या तयार होतील. यामुळे रुग्णांना त्वरीत आणि गुणवत्तापूर्ण भोजन देणे शक्य होणार आहे.
अशोक गोडसे म्हणाले, रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था करण्याकरीता ट्रस्टने हा उपक्रम सुरु केला. चांगले आणि उत्तम अन्न रुग्णांना मिळावे, याकरीता अत्याधुनिक मशिनची व्यवस्था किचनमध्ये करण्यात आली आहे. स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण जेवण देण्याकरीता आम्ही प्रयत्नशील आहोत. रोटी मेकर सारख्या अत्याधुनिक साधनांमुळे ही सेवा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने देणे आता शक्य होणार आहे. एका तासाला एक हजार पोळ्या तयार करण्याची क्षमता या मशिनमध्ये असल्याने किचनच्या माध्यमातून सुरु असलेल्या रुग्ण सेवा उपक्रमाला आणखी बळ मिळेल.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ससून रुग्णालयात ्जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत किचन विभागातर्फे रुग्णांना भोजन देण्याचा उपक्रम सुरु आहे. इंदिरा ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटतर्फे रोटी मेकर मशिन या उपक्रमाला भेट देण्यात आले. यावेळी मशिनच्या उद््घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर.