दिनांक :- २९ डिसेंबर २०१८

dagdusheth ganapati
श्री गणेश लिला, नृत्य आणि नाटयातून भारतीय संस्कृतीचे दर्शन
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्टतर्फे जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात ; यशस्वी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही सन्मान

पुणे : भगवान शंकर-पार्वती आणि श्रीगणेश-कार्तिकेय यांच्या नानाविध लिला… नारदमुनींनी सांगितलेल्या श्रीगणेशाच्या रुपांची महती…नृत्य सादरीकरणातून चिमुकल्यांनी केलेली गणेशाची आराधना… अशा वातावरणात श्री गणेश लिलेसह नृत्य आणि नाटयातून भारतीय संस्कृतीचे दर्शन जय गणेश विद्यार्थी पालकत्त्व योजनेतील विद्यार्थ्यांनी पुणेकरांना घडविले. रंगीबेरंगी पोषाखात नटलेले चिमुकले, चेह-यावर उमटलेले निरागस भाव आणि पारंपारिक, ऐतिहासिक, देशभक्तीपर गीतांवर बालचमुंनी सादर केलेल्या नृत्यप्रकारांना उपस्थितांनी भरभरुन दाद दिली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ प्रस्तुत महाराष्ट्रव्यापी जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन सदाशिव पेठेतील भरत नाटय मंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटाचे अध्यक्ष डॉ.शरद कुंटे, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, योजनेचे प्रमुख ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख, अरुण भालेराव, डॉ.संजीव डोळे, डॉ. प्रदीप सेठीया आदी उपस्थित होते. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनेने झाली. यानंतर गीतेचा १२ वा अध्याय इयत्ता ४वी व ५वी च्या विद्यार्थ्यांनी सादर केला. तर, मुलगा वाचवाचा संदेश देत ५ वी च्या विद्यार्थ्यांनी आगळेवेगळे सादरीकरण केले. आई मला खेळायला जाऊ दे ना वं…हवन करेंगे… रक्तचरित्रमधील फ्युजनसह विविध गीतांवर नृत्यसादरीकरण देखील झाले. सखाराम गटणे ही रत्नाकर कोल्हटकर याने सादर केलेली एकपात्री नाटयछटा कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली.
डॉ.शरद कुंटे म्हणाले, परमेश्वराने प्रत्येकाला काही ना काही दिले आहे. पण आपण त्याकडे लक्ष देत नाही. आपल्यातील कला किंवा क्षमता वाढवून काम केल्यास प्रत्येकजण नक्कीच यशस्वी होऊ शकेल.
डॉ. अ. ल. देशमुख म्हणाले, प्रतिकूल परिस्थिती असून देखील ज्यांची बौद्धिक क्षमता जास्त आहे. अशा विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, संस्कार, समुपदेशन मिळाले. तर सामान्य मुले देखील उत्तम विद्यार्थी होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्यांना शिक्षणाची योजना उपलब्ध करून देण्याचे उत्तम काम या योजनेने केले आहे.
योजनेतील विद्यार्थीनी सुकन्या धुपकर म्हणाली, मी ८ वी मध्ये असताना योजनेमध्ये सहभागी झाले. माझी घरची परिस्थिती हलाखीची होती. मी १३ वर्षांची असताना माझ्या वडिलांचे अपघातामध्ये निधन झाले. त्यावेळी मला ट्रस्टने राबविलेल्या योजनेतून आर्थिक पाठबळासोबत मानसिक आधार मिळाला. संस्कारांची शिदोरी मिळाली, त्यामुळेच आज मी इन्फोसिस सारख्या मोठया आयटी कंपनीमध्ये नोकरी करीत यशाच्या शिखरापर्यंत पोहचू शकले, असेही तिने सांगितले. सौरभ साळेकर, साक्षी दगडे या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले.


फोटो ओळ :श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन भरत नाटय मंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी नृत्य आणि नाट्याचे सादरीकरण करताना चिमुकले.