दिनांक :- २९ जून २०१९

dagdusheth ganapati पालखी सोहळ्याकरीता ‘दगडूशेठ’ तर्फे रुग्णवाहिका आणि टँकर पुण्यातून रवाना
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा पुढाकार; तिन्ही पालख्यांसोबत सुसज्ज रुग्णवाहिका, डॉक्टर्स आणि टँकरची विनामूल्य सोय

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद््गुरु तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यासोबत वारक-यांच्या सेवेकरीता चार सुसज्ज रुग्णवाहिका आणि टँकर पुण्यातून रवाना झाले. दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत या उपक्रमाची सुरुवात झाली असून मोठया प्रमाणात डॉक्टर्स, औषधे व आरोग्यविषयक सेवा पालखी सोहळा समारोपापर्यंत विनामूल्य पुरविण्यात येणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरासमोर रुग्णवाहिकेचे पूजन करुन या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, उत्सवप्रमुख हेमंत रासने, बाळासाहेब सातपुते, विनायक रासने यांसह पदाधिकारी उपस्थित होते. रुग्णसेवेकरीता रुग्णवाहिकेसोबत तब्बल ८ डॉक्टर्स आणि सेवकांची टिम पुण्यातून रवाना झाली आहे.

डॉ. बाळासाहेब परांजपे म्हणाले, तिन्ही पालख्यांसोबत या रुग्णवाहिका सोहळा संपेपर्यंत विनामूल्य सेवा देणार आहेत. सर्व प्रकारची औषधे, सलाईनसह आत्पकालिन परिस्थितीत देखील आवश्यक असणारी साधने रुग्णवाहिकेत आहेत. यंदा दोन नवीन रुग्णवाहिका ट्रस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या असून याचा लाभ वारक-यांना होणार आहे. ज्या ज्या ठिकाणी पालखी मुक्काम असेल, तेथे देखील रुग्णवाहिका सेवा देणार आहेत. दररोज ३ ते ४ हजार वारकरी सेवेचा लाभ घेतात.

हेमंत रासने म्हणाले, सासवड मार्गे जाणा-या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत आणि लोणीमार्गे जाणा-या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत या रुग्णवाहिका व टँकर असणार आहेत. कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास करणा-या वारक-यांच्या आरोग्याची काळजी घेत, आवश्यक आरोग्यविषयक सेवा त्वरीत मिळाव्यात, याकरीता या उपक्रमाचे आयोजन केले जाते. गेली अनेक वर्षे ट्रस्ट सातत्याने हा उपक्रम राबवित आहे.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद््गुरु तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यासोबत सेवा देण्यास जाणा-या रुग्णवाहिकांची पूजा करण्यात आली. यावेळी उपस्थित विश्वस्त व डॉक्टर्स.

V008
V007
V006
V005
V003
V001