दिनांक :- २८ ऑगस्ट २०१९

dagdusheth ganapati ‘दगडूशेठ’ च्या श्री गणेश सूर्यमंदिर सजावटीचे उद््घाटन सोमवारी
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट; शिर्डी कोकमठाण येथील प.पू.विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सजावटीचे उद््घाटन

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त श्री गणेश सूर्यमंदिर साकारण्यात आले आहे. गणेश चतुर्थीला सोमवार, दिनांक २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी शिर्डी कोकमठाण येथील प.पू.विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद््घाटन सायंकाळी ७ वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला सुनील रासने, डॉ.बाळासाहेब परांजपे, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, विवेक खटावकर, प्रकाश चव्हाण, अक्षय गोडसे, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

सोमवारी (दि.२) प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून शेषात्मज रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. फुलांनी साकारलेले २१ नाग रथावर लावण्यात येणार आहेत. सुभाष सरपाले यांनी ही सजावट केली आहे. दुपारी १२.२० पर्यंत प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम होणार असून भाविकांनी दुपारी १२.३० नंतर श्रीं च्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. यंदाची सजावट असलेले श्री गणेश सूर्यमंदिर ओडिशा राज्यातील विश्वप्रसिद्ध प्राचीन आश्चर्य ठरलेल्या कोणार्कच्या सूर्यमंदिरावर आधारित आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ट्रस्टतर्फे साकारण्यात येणारी ही प्रतिकृती भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे. लाखो मोतिया रंगाच्या दिव्यांनी हे मंदिर उजळून निघणार आहे. अत्याधुनिक लाईटस्ने विद्युतरोषणाई करण्यात येत आहे. मंदिरामध्ये तसेच रस्त्याच्या दुतर्फा २२५ झुंबर लावण्यात आली असून मारणे इलेक्ट्रीकल्स यांनी लावलेली आहेत. तर, शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे कलादिग्दर्शन, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केले आहे.

मंगळवार, दिनांक ३ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे २५ हजार महिला सामुदायिकरित्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. त्यानंतर सकाळी ९ वाजता गणेशयागाचा शुभारंभ प.पू.गुरुवर्य योगिराज भाऊमहाराज परांडे यांच्या हस्ते होणार आहे. रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत हरी जागर च्या माध्यमातून महाराष्ट्रातील समस्त वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. याशिवाय बुधवार, दिनांक ४ सप्टेंबर रोजी सूर्यनमस्कार व गुरुवार, दिनांक ५ सप्टेंबर रोजी अग्निहोत्र यांसह उत्सवात वेदपठण, महिला हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

दररोज पहाटे ५ पासून महाअभिषेक पूजा होणार असून सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ यावेळेत मिलींद राहुरकर शास्त्री व दुपारी १२ ते ४ यावेळेत दाक्षिणात्य पद्धतीने नटराजशास्त्री यांच्या उपस्थितीत गणेशयाग होणार आहे. दिनांक ३ ते ११ सप्टेंबर दरम्यान दररोज पहाटे ५ ते ६ यावेळेत विविध शाळांतील विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. सोमवार, दिनांक ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ५ यावेळेत मंत्र जागर होणार आहे. अनंत चतुर्दशीला दिनांक १२ सप्टेंबर रोजी श्रींची वैभवशाली सांगता मिरवणूक श्री विकटविनायक रथातून निघणार आहे.

* यंदाची सजावट असलेल्या श्री गणेश सूर्यमंदिराचे वैशिष्टय
यंदाच्या मंदिराच्या प्रतिकृतीची साकारण्यात येणारी संकल्पना भारताच्या प्राचीन वेद, पुराणे, शास्त्रे यावर आधारित आहे. उंच शिखरे, मंडप असलेले हे सूर्यमंदिर आहे. गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरीता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. सूर्याच्या प्रभात, माध्यान्य आणि सायंकालीन अवस्थांचे मनोहारी दर्शन तसेच १२ आदित्य आणि सूर्यास प्रिय असलेल्या कमल, पुंडरिक आणि उत्पालांच्या लता-वेलींच्या डौलदार नक्षींनी व्यापलेले मंदिर भाविकांना यंदा पाहता येणार आहे. अनेक स्तंभ, मालांची तोरणे आणि सिंह, कीर्तिमुख, हंस, यक्ष, सुरसुंदरी आणि आकाशगामी गंधर्वांनी मंदिर सजविले जाणार आहे.

सोन्यासारख्या प्रकाशाने व्यापलेले मंदिर गजांत लक्ष्मीने नटलेले असणार आहे. समृद्धीचे प्रतिक असलेले हत्ती, अरुणाच्या सारथ्याने प्रचंड सूर्यरथाचे धावणारे अश्व व रथचक्र हे असणार आहेत. मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये अनेक स्तंभी पद्मपीठाच्या सुवर्णी सिंहासनावर श्रीं ची मूर्ती विराजमान होणार आहे. सारसबागेजवळील बाबुराव सणस मैदानासमोरील सजावट विभागात सजावटीचे काम पूर्ण होत आले असून अनेक कारागिरांनी याकरीता दिवसरात्र मेहनत घेतली आहे.

* गणेशभक्तांसाठी ५० कोटींचा विमा व उत्सवावर तब्बल १५० कॅमे-यांचा वॉच
पुणे शहर मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा यांसह कँन्टोमेंट बोर्ड हद््दींतर्गत गणेशभक्तांसाठी तब्बल ५० कोटींचा विमा ट्रस्टतर्फे काढण्यात आला आहे. यामध्ये चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला वा हवाई हल्ला झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. यामध्ये अपघाती मृत्यु झाल्यास प्रति व्यक्तीला ५ लाख रुपये, अपघातात अंशत: अपंगत्त्व आल्यास २ लाख रुपये आणि अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्ती ५० हजार रुपयांपर्यंत औषधाचा खर्च देण्यात येईल. दिनांक १ ते १३ सप्टेंबर पर्यंत ही विम्याची सुविधा असणार आहे.

याशिवाय गणपतीच्या कायमस्वरुपी उभारलेल्या मंदिरात येणा-या भाविकांचा ५ कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. यामध्ये देखील चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला वा हवाई हल्ला झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. यामध्ये अपघाती मृत्यु झाल्यास प्रति व्यक्तीला २ लाख रुपये, अपघातात अंशत: अपंगत्व आल्यास १ लाख रुपये, अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला ५० हजार रुपयांपर्यंत औषधाचा खर्च देण्यात येईल. अतिरेकी हल्ला झाल्यास मंदिराच्या किलोमीटरच्या परिसरातील दुकान किंवा घराचे नुकसान झाले तर हा विमा लागू आहे. गणेशाचे कायमस्वरुपी मंदिर व मंदिरापासून १ किमीच्या परिसरातील फक्त भाविकांसाठीच हा विमा असणार आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव देखाव्याच्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच फरासखाना चौक, बाबू गेनू गणपती, दगडूशेठ दत्तमंदिर, सिटीपोस्ट अशा परिसरात देखील सीसीटिव्ही कॅमेरे असणार आहेत. याशिवाय मंदिर परिसरात कायमस्वरुपी असलेल्या कॅमे-यांचा वॉच उत्सवावर असणार आहे. त्यामुळे तब्बल १५० कॅमे-यांद्वारे या परिसरावर पोलीस यंत्रणेसोबत ट्रस्टची २०० पुरुष व महिला यांची खासगी सुरक्षाव्यवस्था लक्ष ठेवणार आहे.

Dagdusheth Ganpati
DSC_9333