दिनांक :- २६ डिसेंबर २०१८

dagdusheth ganapati
अंगारकीनिमित्त पुष्पमहालात ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा विराजमान
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; भाविकांची दर्शनासाठी पहाटेपासून अलोट गर्दी

पुणे : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…ओम् गं गणपतये नम :… अशा गणेशनामाच्या जयघोषाने दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. वर्षातील शेवटचा अंगारकी संकष्टी चतुर्थी योग असल्याने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली आकर्षक सजावट आणि विद्युतरोषणाने दगडूशेठचे गणपती बाप्पा पुष्पमहालात विराजमान झाल्याचा भास होत होता.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरामध्ये पहाटे स्वराभिषेकाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गायिका अनुराधा कुबेर यांनी गायनसेवा दिली. त्यानंतर गणेशयाग आयोजित करण्यात आला. मंदिरावर केलेल्या पुष्पसजावटीमध्ये ३ हजार किलो झेंडू, २ हजार किलो शेवंती, २२ हजार कामिनी गड्डया, गुलाब यांसह नानाविध ६ हजार किलो फुलांचा समावेश होता. सुभाष सरपाले आणि २५० महिला व पुरुषांनी सलग तीन दिवस काम करुन सजावट साकारली.
मंगळवारी पहाटे ३ वाजल्यापासून भाविकांकरीता दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांनी मोठया संख्येने गर्दी केली. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर रस्ता, अप्पा बळवंत चौकाच्या अलिकडेपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. गणेशचरणी गायिका अनुराधा कुबेर विविध राग आणि भक्तीगीतांच्या माध्यमातून केलेल्या स्वराभिषेकाचे साक्षीदार होण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळाली. मंदिरावर आकर्षक तोरण आणि रांगोळ्यांची सजावट देखील करण्यात आली होती.


फोटो ओळ :श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त पुष्पमहालासारखी गणपती मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी भाविकांची गर्दी. पुष्पमहालात विराजमान झालेले गणरायाचे विलोभनीय रुप.