दिनांक :- २६ जुलै २०१९

dagdusheth ganapati ‘दगडूशेठ’ च्या श्री गणेश सूर्यमंदिर सजावटीचा वासापूजनाने श्रीगणेशा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; विश्वस्त, पदाधिकारी यांची उपस्थिती

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त यावर्षी गणेशोत्सवात श्री गणेश सूर्यमंदिर साकारण्यात येणार आहे. यंदाच्या सजावटीचे वासापूजन बुधवार पेठेतील सजावट स्थळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते झाले. जय गणेश आणि मंत्रपठणाच्या जयघोषात ट्रस्टचे विश्वस्त व कार्यकर्त्यांनी यंदाच्या सजावटीच्या तयारीचा श्रीगणेशा केला.

यंदाच्या मंदिराच्या प्रतिकृतीची साकारण्यात येणारी संकल्पना भारताच्या प्राचीन वेद, पुराणे, शास्त्रे यावर आधारित आहे. उंच शिखरे, मंडप असलेले हे सूर्यमंदिर ओडिशा राज्यातील विश्वप्रसिद्ध प्राचीन आश्चर्य ठरलेल्या कोणार्कच्या सूर्यमंदिरावर आधारित आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ट्रस्टतर्फे साकारण्यात येणारी ही प्रतिकृती भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरीता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. सूर्याच्या प्रभात, माध्यान्य आणि सायंकालीन अवस्थांचे मनोहारी दर्शन तसेच १२ आदित्य आणि सूर्यास प्रिय असलेल्या कमल, पुंडरिक आणि उत्पालांच्या लता-वेलींच्या डौलदार नक्षींनी व्यापलेले मंदिर भाविकांना यंदा पाहता येणार आहे. अनेक स्तंभ, मालांची तोरणे आणि सिंह, कीर्तिमुख, हंस, यक्ष, सुरसुंदरी आणि आकाशगामी गंधर्वांनी मंदिर सजविले जाणार आहे.

सोन्यासारख्या प्रकाशाने व्यापलेले मंदिर गजांत लक्ष्मीने नटलेले असणार आहे. समृद्धीचे प्रतिक असलेले हत्ती, अरुणाच्या सारथ्याने प्रचंड सूर्यरथाचे धावणारे अश्व व रथचक्र हे असणार आहेत. मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये अनेक स्तंभी पद्मपीठाच्या सुवर्णी सिंहासनावर श्रीं ची मूर्ती विराजमान होणार आहे. सारसबागेजवळील बाबुराव सणस मैदानासमोरील सजावट विभागात सजावटीचे काम सुरु झाले असून अनेक कारगिर याकरीता दिवसरात्र काम करीत आहेत. शिल्पकार विवेक खटावकर हे मंदिराचे काम करीत आहेत.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त गणेशोत्सवात श्री गणेश सूर्यमंदिर साकारण्यात येणार आहे. यंदाच्या सजावटीचे वासापूजन बुधवार पेठेतील सजावट स्थळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या हस्ते झाले.

S007
V004
V005
V006