दिनांक :- २६ जुलै २०१९

dagdusheth ganapati मन पवित्र करण्यासाठी प्रवचन ऐका
ह.भ.प. बाबामहाराज सातारकर; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे चातुर्मासानिमित्त हरिपाठावरील प्रवचनाचे आयोजन; पुणेकरांना विनामूल्य प्रवेश

पुणे : प्रवचनाला येऊनसुध्दा अनेकांच्या मनात वाईट विचार येतात. मनात वाईट विचार येणे हे वाईट नाही, ती जीवनाची घटना आहे. परंतु ते वाईट विचार जर कृतीतून उतरले तर ते वाईट आहे. म्हणून नेहमी परमेश्वराला दुर्बुध्दी दूर कर अशी प्रार्थना करावी. परमार्थ करायचा असेल तर तुमच्या मनात परमार्थीक ज्ञानाव्यतिरिक्त कोणताही वाईट विचार नको. याकरीता शुध्द मती हवी आणि शुध्द मतीसाठी नामस्मरण आणि संतांची संगती महत्वाची आहे. मन पवित्र करण्यासाठी प्रवचन ऐका, असे मत प्रवचनकार ह. भ. प. बाबामहाराज सातारकर यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे चातुर्मास सोहळ्यानिमित्त सातारकर यांच्या प्रवचनाचे आयोजन स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठावर ते निरुपण करीत आहेत. शुध्दमन, … या विषयांवर त्यांनी निरुपण केले.

ह.भ.प.बाबामहाराज सातारकर म्हणाले, नि:शंक मनाच्या व्यक्ती सु मनाच्या म्हणजे शुध्द मनाच्या असतात. अशा व्यक्ती कोणाबद्दलही वाईट विचार किंवा निंदा करीत नाहीत. पवित्र मनाच्या व्यक्तीला कोणतीही वाईट गोष्ट ऐकल्यानंतर दु:ख होते. प्रवचनाला येणे म्हणजे फक्त नामस्मरणासाठी नाही, तर मन पवित्र होणे हा देखील प्रवचनाचा एक भाग आहे. शुध्दमनामुळे जीवनात कोणत्याही प्रसंगाला शांतपणे सामोरे जाता येते. या शुध्द मनाचा फायदा जीवनातील प्रत्येक टप्प्यावर नक्की होतो.

पुढे ते म्हणाले, अध्यात्मातील गुज सांगण्यासाठी व्यक्ती देखील तशीच असली पाहिजे, ज्याच्यावर आपला पूर्ण विश्वास असेल. ज्ञानोबांनी देखील हरिपाठातील ‘तपेवीण दैवत दिधल्याविण प्राप्त, गुजेंविण हित कोण सांगे… ‘ या ओवीमध्ये हेच सांगितले आहे. गुज ऐकणा-या व्यक्तीचे मन देखील शुध्द असावे लागते. परमेश्वराचे स्मरण प्रवचनाला आल्यानंतरच करायचे असे नाही, तर दैनंदिन जीवनात काम करीत असताना देखील त्याचे स्मरण करा. हरिनामाचे श्रेष्ठत्व इतके आहे, की त्यामुळे मनात येणारे वाईट विचार देखील नाहीसे होतात, असे ही त्यांनी सांगितले.

हे प्रवचन दिनांक १९ आॅगस्ट पर्यंत दररोज सायंकाळी ७ ते ८ या वेळेत होणार आहे. महिनाभर सुरु राहणा-या या प्रवचनाला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे चातुर्मास सोहळ्यानिमित्त ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांच्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठावर प्रवचनाचे आयोजन स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. यावेळी बोलताना ह.भ.प.बाबा महाराज सातारकर.

B01